infomarathi
- संभाजीराजे, इतिहास

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक

छत्रपती शिवाजी महाराज यांनी छत्रपती पदाने रयतेला स्थैर्य दिले होते. रयतेच्या मनात आपले राज्य, आपली व्यवस्था ज्यामध्ये आपल्याला न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळु शकेल हा विश्वास सामन्यातील सामान्य अश्या रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला. छत्रपती हे केवळ पद राहिले नव्हते तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले. जुलमी व्यवस्थेविरुद्ध लढून कल्याणकारी राजाचे व राज्याचे प्रतीक बनले.

राज्यकारभारात एखाद्या शासनकर्त्याचे निधन झाल्यास त्याची जागा कोण घेणार असा प्रश्न निर्माण होतो. छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतरही हा तशी काही परिस्थिती नव्हती. मात्र जाणीवपुर्वक वाद निर्माण केले जातात. वास्तविक शिवरायांच्या राज्याभिषेक समयी सोयराबाईंना पट्टराणी तर संभाजी राजेंना युवराज म्हणुन मान मिळाला. तिथेच स्वराज्याचे पुढचे छत्रपती संभाजीराजेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले. 

शंभुराजे लहानपणापासुनच जिजाऊ आणि शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत होते. त्यात ते तरबेजही झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली पण स्वतःचा राज्याभिषेक केला नव्हता.

infomarathi
Sambhaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती तसेच स्वराज्याच्या विरोधात शत्रूच्या हालचाली ही वाढल्या होत्या.या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी व रयतेच्या मनातील निर्माण झालेली भीती दूर करून स्वराज्याची घडी नीट बसवण्यासाठी संभाजी महाराजांना राज्याभिषेक करणे महत्वाचे वाटू लागले त्यामुळे शंभु राजेंनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर छत्रपती शिवरायांचे आकस्मिक निधन झाले. शंभुराजांच्या गैरहजेरीत बाल राजारामांना गादीवर बसवुन काही स्वार्थी दरबारी मंत्र्यांनी आपल्या हातात राज्यकारभार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात अपयश आले. शंभुराजांनी पन्हाळगडावरुनच ही कठीण परिस्थिती हाताळुन राज्यकारभाराची घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वराज्याला दुसऱ्या छत्रपतींची आवश्यकता निर्माण झाली होती. छत्रपती शिवरायानंतर रायगडी काहीं काळ गोंधळ माजला होता. जो शंभु राजेंनी रायगडावर येई पर्यंत होता.

शंभू महाराज रायगडावर आले व त्यानंतर शंभु राजेंचा तात्कालिक श्रावण शु ५, शके १६०२. ज्युलियन तारीख २० जुलै १६८० रोजी शंभु राजेंचे तात्कालिक मंचकारोहण होऊन त्यांना राजा घोषित करण्यात आले. आता मंचकारोहण आणि राज्याभिषेक यामध्ये फरक आहे मंचकरोहण म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी जर वेळ किंवा उशीर होत असेल तर मंचकरोहणाद्वारे ती व्यक्ती किंवा राजा हा काळजीवाहू राजा म्हणून राज्याचा कारभार सांभाळतो.

यामध्ये विधीशिवाय अथवा कोणत्या समारंभाशिवाय थेट गादीवर बसून राज्यकारभार केला जातो. मंचकरोहण झाल्या नंतर जवळपास ६ महिन्यांनी माघ शु ७, शके १६०२. ज्युलियन तारीख 14-15-16 जानेवारी १६८१ रोजी शंभु राजेंचा विधीवत राज्याभिषेक करण्यात आला.

मल्हार रामराव चिटणीस, अनुपुराणकार वगैरे ह्या दोन्ही गोष्टींचा उल्लेख तर करतात; पण त्यात सुद्धा हे विधी कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाल्या त्या संदर्भात स्पष्ट उल्लेख नाही. परंतु, छ.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर महाराजांच्या इच्छेनुसार गागाभटांनी “श्लोक वर्तीका” हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथाच्या लिखाणादरम्यानच गागाभटांनी संन्यास घेतल्याचे संकेत त्यात मिळतात.

संभाजी महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करवुन घेण्याचे ठरवील्यानंतर त्यांनी या विधीसाठी गागाभटांना घेऊन येण्यास काही जाणकारांना पाठवीले होते. पण वाढलेल्या वयामुळे हा प्रवास त्यांना शक्य नव्हता तसेच त्यावेळी ते संन्यासी होते. म्हणुन हा राज्याभिषेक गागाभटांनी च वरील ग्रंथामध्ये सांगीतलेल्या विधीनुसार भोसले घराण्याच्या कुलाधिपतींनी पार पाडला. गागाभटांनी १६८१ मध्ये “समयनय” हा ग्रंथ लिहुन संभाजी महाराजांना पाठवीला होता. याबाबत चे संदर्भ श्री शिवराज्याभिषेक प्रयोग या ववा.सि.बेंद्रे यांनी लिहिलेल्या पुस्तकात सापडतील.

संभाजी राजांचा राज्याभिषेक वर उल्लेख केलेल्या दोन्हीही साधनांच्या आधारे वैदिक पद्धतीनेच झाला असल्याचं स्पष्ट दिसतं. अनेक होम-हवन करण्यात आले. हे सगळं मुख्यतः कवी कलशाच्या मार्गदर्शनाखाली झालं. कलशाला पुढे तर संभाजीराजांनी ‘कुलएखत्यार’ म्हणजे सगळ्या कामकाजाचा अधिकारी म्हणूनच नेमलं.

प्रत्यक्ष कोणत्या ब्राम्हणाकडून अभिषेक झाला याबद्दल मात्र कसलीही नोंद नाही सापडत. पण प्रा. नामदेवराव जाधव यांच्या माहिती नुसार शिवयोगी पंडित यांनी केला. याबाबतच संशोधन अजून चालू आहे. थोडक्यात वैदिक पध्दतीने मोठ्या उत्साहात धार्मिक विधीवत शास्त्रोक्त पद्धतीने शंभू महाराजांचा राज्याभिषेक झाला.

१४, १५ व १६ जानेवारी १६८१ (रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२) यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. राज्याभिषेक प्रसंगी पुर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने शंभुराजांनी कैद्यांना मुक्त केले. प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, निळोपंत, बाळाजी आवजी, जनार्धनपंत आदींना सन्मानाने शंभू महाराजांच्या प्रधान मंडळ नेमुन त्यांना कारभार सांगितला व योग्य तो कारभार दिला.

शंभुराजांची राजमुद्रा:

७ मे १६८० रोजी रुद्राप्पा देसाई याला लिहिलेल्या पत्रात महाराजांची राजमुद्रा दिसुन येते. शंभुराजांची राजमुद्रा शिवरायांपेक्षा वेगळी असुन तिचा आकार पिंपळाच्यापानासारखा आहे.
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||
अर्थ- शिवपुत्र श्री शंभो यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणुन असणार नाही तर सर्वांवर छत्र म्हणुन राहील.

संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना:

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले ). श्री सखी राज्ञी जयति – छत्रपती येसुबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी), सरसेनापती – हंबीरराव मोहिते, कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) – कवी कलश, पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे, मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी, दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव, चिटणीस – बाळाजी आवजी, सुरनीस – आबाजी सोनदेव, डबीर – जनार्दनपंत, मुजुमदार – अण्णाजी दत्तो, वाकेनवीस – दत्ताजीपंत.

छत्रपती संभाजी महाराजांची नाणी:

शिवरायांप्रमाणेच शंभुराजांनीही आपल्या राज्याभिषेक प्रसंगी स्वतःच्या नावे नाणी पाडली. सदर नाण्याच्या पुढच्या बाजुवर “श्री राजा शंभूछत्रपती” ही अक्षरे कोरलेली असुन मागच्या बाजुवर “छत्रपती” हे अक्षर कोरलेले आहे.

राज्याभिषेकानंतर शंभुराजांची कर्तबगारी:

आपला राज्याभिषेक झाल्यानंतर शंभुराजांनी मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ आठच वर्षात शिवरायांनी उभारलेले स्वराज्य दुप्पट केले. सैन्यही दुपटीपेक्षा अधिक वाढविले. स्वराज्याच्या खजिन्यात तिपटीपेक्षा अधिक वाढ केली. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले. केवळ ९ वर्षांच्या काळात त्यांनी १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला.

infomarathi
Sambhaji Raje

याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्‍या धर्मांध लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्‍यांमुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला होता. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली. 

लेखन-विजयश भोसले. माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला इमेलद्वारे पाठवू शकता.  

Thank You!