Shivaji Maharaj, Infomarathi
- शिवाजी महाराज, इन्फोमराठी

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारविषयक धोरण

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारविषयक धोरण हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. “साहुकार (व्यापारी) हे राज्याचे भूषण आहेत” असे त्यांचे ब्रीद होते. त्यांनी देशी व्यापाऱ्यांना परदेशात व्यापार करण्याची मुभा दिल्याने शिवकाळात व्यापार वाढीस लागला. शिवरायांनी आपला राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. परदेशी व्यापाऱ्यांनाही त्यामुळे उत्तेजन मिळाले. शिवरायांच्या प्रयत्नांमुळे स्वराज्याचा व्यापार जवळजवळ २५ देशातील व्यापाऱ्यांसोबत सुरु होता.

राज्याचा कोषागार जर संपन्न व भरलेला असेल तर त्या राज्याची प्रगती निश्चितच होते. राज्याची व रयतेची आर्थिक स्थिती सुधारते. लढाईमध्ये गनिमाचे हस्तगत केलेला सर्व मुद्देमाल कोषागारात जमा करणे हा मराठी फौजांचा शिरस्ता होता आणि म्हणूनच शिवकालीन मरगठ्ठा हा प्रगतीवर होता. आर्थिक सुबत्तेकरिता कास्तकार व शिलेदार यांना मध्यबिंदू मानून छत्रपती शिवरायांनी अर्थकारण केले.

हिंदुस्थानचा इतिहास नजरेखालून घातल्यास स्पष्टपणे जाणवते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक सुबत्तेसाठी उद्योगावर जितका भर दिला तितका इतर शासनकर्त्यांनी दिला नाही. राज्याचे कोषागार नेहमी श्रीमंत असावे म्हणून प्रजेचा आर्थिक छळ न करता योग्य व माफक साराभरती व करवसुली झाली पाहिजे, अशी सक्त ताकीद महाराजांनी चिटणीसांना दिली होती. शेती हा हिंदवी स्वराज्याचा मुख्य उद्योग. म्हणून शेतकी तंत्रज्ञान विकसित व्हावे या हेतूने महाराजांनी दादोजी कोंडदेवांना पाहणी करण्यास सांगितले होते. महसूल विभागाला पिकाचे रास्त मोजमाप करून न्यायोचित करवसुली करावी असा दंडक घालून दिला होता.

राज्याभिषेकप्रसंगी ईस्ट इंडिया कंपनीचा दूत हेन्री ऑझ्किडन याचा नजराणा स्वीकारताना शिवप्रभूंनी इंग्रजांना सक्त आदेश दिला होता की, इंग्रजी गलबते मराठय़ांच्या सागरी हद्दीच्या चाळीस मैलाबाहेर मुशाफिरी करतील. एतद्देशीय मच्छीमारास नुकसान करणार नाहीत याची खबरदारी घ्या. हा प्रसंग १६७४ सालातला. त्यानंतर बरोबर तीनशे वर्षांनी हिंदुस्थान सरकारने १९७४ मध्ये जो सागरी कायदा केला त्याचे मूळ या शिकवणीत होते. तो आधुनिक सागरी कायदा म्हणजे ‘एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन सी लॉ’ होय. त्याचाच अर्थ राष्ट्राचा व्यापारउदीम, संपत्ती संरक्षण व अर्थनियोजन याबाबत शिवाजी महाराजांचे विचार व योजना काळाच्याही फार पुढे होत्या आणि म्हणून समृद्ध व प्रगल्भ होत्या.

एका पोर्तुगीज अंमलदाराने आपल्या राजाला लिहिलेल्या गुप्त पत्रावरून प्रकाशात आले आहे की, १६५९ मध्ये छत्रपतींच्या मराठा आरमारात केवळ २८ जहाजे होती, पण जंगी बेडय़ात (नेव्हल फ्लीट) राज्याभिषेकप्रसंगी १६७४ मध्ये ७४ युद्धनौका खडी तालीम देत सागरात गस्त घालत होत्या. हिंदुस्थानच्या इतिहासात जे प्रमुख शास्ते झाले त्यात सागरी आरमारी बळाचे महत्त्व शिवरायांनी ओळखून नौसेनेची जी उभारणी केली ती फारच मोलाची होती. शिवरायांपूर्वी केरळात डच, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध कुंजाली राजे आरमार उभारून १०० वर्षे लढले खरे, पण ते प्रयत्न दिशाहीन व असंघटित होते. शिवरायांनी मात्र जाणीवपूर्वक व योजनाबद्ध आरमार उभे केले.

जहाजबांधणी उद्योगात वारली, कातकरी या मागास जातींना गुंतवून महाराजांनी आदेश काढला की, गोऱया टोपीकरांकडून जहाजबांधणी कला आत्मसात करून त्यात देशी बांधणीचा अपूर्व मिलाफ करा. म्हणजे सेवायोजना आपोआप होऊन आरमाराला बळ प्राप्त होईल. कुलाबा येथे शिवकालीन आंग्रे कुलोत्पन्न तुकोजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली जहाजबांधणी कारखाना कार्यरत होता. ‘कुलाबा’ या शब्दाचा अर्थच गोदी होय. या गोदीत शिरब, पाल, गलबत ही अर्वाचीन काळातील जहाजे बांधली जात. हिंदुस्थानातील जहाजबांधणी उद्योगाची ती पहिली पायरी होती.

रत्नदुर्गच्या (रत्नागिरी) दक्षिण अंगाला उत्खननात एक भुयार सापडले. निरीक्षण केले असता समजले की, तो एक तरता तराफा होता. त्याद्वारे जहाजांना युद्ध सुरू असतानासुद्धा किरकोळ डागडुजी करून जायबंदी जहाज पुन्हा मोहिमेवर रवाना केले जात असे. यालाच ‘फ्लोटिंग डॉक्स फॉर बेस रिपेअरिंग युनिट्स’ असे आधुनिक काळात संबोधतात. अशा या दुर्गम जलदुर्गावर दोन-तीन टनांच्या प्रचंड तोफा मावळय़ांनी कशा चढविल्या, हे एक कोडेच आहे.

याचाच अर्थ शिवरायांचे दळणवळण खाते तंत्रयुद्ध व अद्ययावत होते हे दिसून येते. स्वयंभू भौगोलिक महत्त्वामुळे शिवरायांनी दख्खनचे जिब्राल्टर म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. या गडावरून देश व कोकण या दोन्ही प्रांतांवर करडी नजर ठेवता येते. या राजधानीची मांडणी करताना प्रथम शिवप्रभूंनी बाजाराची जागा मुक्रर करून गडावर ऐन वख्ताला दाणापाणी कमी पडू नये याची खात्री व सोय करून ठेवली.

या बाजारात सैन्याला रास्त दराने वस्तू मिळून शिबंदीत कमतरता न भासता व्यापारात वृद्धी होऊन स्पर्धात्मक तत्त्वावर उत्तमोत्तम चीजवस्तू प्रजाजनांना मिळतील अशी व्यवस्था व योजना होती. बारा बलुतेदारांना स्वराज्याच्या सेवेत आणून भूमिपुत्रांना उद्योगधंद्यात उत्तेजन दिले. शस्त्रास्त्र निर्मिती सुरू केली. महाराजांनी किल्लेदार व गडकरी यांना काही सुरक्षा सूचना आपल्या आज्ञापत्रातून दिल्या आहेत. ‘गडकरीहो, सावध चित्ताने वर्तणूक ठेवून दुर्गाची निगा राखणे, अंधाऱया रात्री गडाचे आगळ, कडीकोयंडे कोठारात वातीच्या दिव्याचा वापर न करणे, अन्यथा उंदीर तेलाच्या लोभाने वात पळवताना कोठारास आग लागून स्वराज्याच्या संपत्तीचे नुकसान होईल. याबाबत कसुरात टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही. झाल्यास मुलाहिजा न ठेवता देहदंड.’

स्वतंत्र्य आरमाराची स्थापना करुन शिवाजी महाराजांनी महारष्ट्राच्या इतिहासाला जी कलाटणी दिली तिच्या मागे आधुनिकिकरणाचे तत्वज्ञान होते. त्यांनी पश्चिम किनार्यावरील दरवाजा उघडुन पाश्चात्य सुधारणेचा कालवा इकडे आणण्याची तजवीज चालविली होती. परकिय व्यापारास उत्तेजन तर द्यायचेच सोबत आपल्या आरमाराचे नियमन करावयाचे असा दुहेरी बेत शिवरायांनी आखला. त्यांना पाश्चात्यांच्या नौकानयनाची पुर्ण जाणीव होती. त्यांनी डच,इंग्रज,पोर्तुगिज ह्यांच्याकडुन बर्याच कल्पना उचलल्या.

मराठी राजवटीत शिवराय हे एकमेव राजे आहेत ज्यांनी तारवांतून स्वारी केली,ही गोष्ट याबाबत विसरण्यासारखी नाही. शेतीप्रमाणेच सरकारी उत्पन्नाचे दुसरे महत्वाचे साधन म्हणजे व्यापार व उद्योगधंदे. पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे म्हणजे एका अर्थी व्यापाराच्या रक्तवाहिन्या होत्या. इथूनच सर्वदूर मालाची आयातनिर्यात केली जाई. या मालावरील जकाती म्हणजे सरकाराते प्रंचड उत्पन्न होते. महाराजांच्या वेळी पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, अॅबिसिअन, चिनी व बेहेरोनी, आर्निनियन, तार्तार, ग्रीक, अरब हे परदेशी व्यापारी भारताशी व्यापार करीत.स्वराज्यात फारसा माल तयार होत नव्हता,तरी राजापुरी पंचा व लोटा तसेच भिवंडीची हातमागावरील वस्त्रे व चौलचे रेशमी कापड, मीठ, आंबे, सुपारी, नारळ इ.वस्तुंची निर्यात लक्षणीय होती.

महाराजांनी परदेशी व्यापार धोरण राबवण्यास सुरुवात केली.”साॅल्ट फ्लीट “(Salt flit) म्हणजे मीठ वाहुन नेणार्या बोटींचा तांडा मराठ्यांकडे होता. मुलखातील चौल,दाभोळ,कल्याण,भिवंडी,वेंगुर्ला,पेण हि ठिकाणे चांगलीच भरभराटीस आले.चौल हे दख्खनेतील सर्वात मोठी बाजार पेठ होती. पश्चिम किनारपट्टी महाराजांच्या ताब्यात येताच त्यांनी भरपुर व्यापारी उत्पन्न मिळू लागले. शिवाय मीठाच्या व्यापारही प्रंचंड असुन त्याचे उत्पन्न दांडगे होते. काही मिठागरे पोर्तुगिज हद्दीत होते. पुष्कळदा व्यापारी स्पर्धा चाले. गोवेकरांच्या स्पर्धेमुळे स्वराज्यातील मीठ व्यापार धोक्यात आला बरीच मिठागरे ओस पडली अशा वेळेस ह्या व्यापाराय संरक्षण देण्याच्या दृष्टीने मीठावर जबर कर बसवला.

अर्थशास्रामध्ये ह्या धोरणास’ policy of protection” असे म्हणतात. मीठ वाहतुकीत बचतीसाठी त्यांनी कारंजाहुन मीठ आणण्याऐवजी ट्राॅंम्बेहुन मीठ आणण्याचा हुकुम नौदलास दिला. त्यामुळे ४०० खंडी मीठ आधी १०० आण्यास विकले होते तेच मीठ आता ४६ आण्यास विकले. अरबस्तानाशी व्यापार करण्यासाठी मजबुत व अवजड अशी दोन जहाज बांधली व ती जैतापुर मार्गे मोखा येते पाठवली. लढाऊ गलबतांवर मोठ्या व लहान तोफा,बंदुकी,हुक्के ही शस्त्रे असत. इंग्रज व पोर्तुगिजांकडून महाराजांनी तोफा विकत घेतल्या. इंग्रजांच्या पितळी तोफेचे प्रमुख खरेदीदार महाराजचं होते.

हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाने ही महाराष्ट्राची पावनभूमी पवित्र झाली आहे. सुमारे तीनशे शतकांच्या परचक्राच्या प्रदीर्घ अंधाऱ्या रात्रीनंतर महाराष्ट्राच्या भूमीवर स्वराज्याचा उष:काल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा महाराष्ट्र भूमीला मिळाला. दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबल इच्छाशक्ती, मुत्सुध्दी, रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा अशा विविध गुणांनी परिपूर्ण छत्रपती शिवरायांनी ‘प्रतिपचंद्ररेखेव वर्धिष्णू’ अशा स्वराज्याची स्थापना केली.

माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला इमेलद्वारे पाठवू शकता.

Website: www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *