नील आर्मस्ट्राँग, infomarathi
- माहिती, इन्फोमराठी

चंद्रावर पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्राँग यांनी का मागितली होती इंदिरा गांधी यांची माफी?

अमेरिकेत २० जुलै १९६९ रोजीची संध्याकाळ नवलाईची होती. तेथील लाखो लोक त्यांच्या दूरदर्शन संचावर माणसाने चंद्रावर पाऊल ठेवून मिळवलेला चांद्रविजय पाहण्यासाठी उत्सुक होते. अपोलो-११ या यानाने नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रिन चंद्रावर उतरले. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच चंद्रावर मानवी पाऊल पडले. या मोहिमेपूर्वी चंद्रासारखा पृष्ठभाग असलेल्या अमेरिकेतील अरिझोना उल्कापात विवर, सनसेट विवर येथे चांद्रवीरांनी सराव केला होता. ग्रीक पुराणातील प्रकाशाची देवता असलेल्या झिअसच्या पुत्राचे नाव अपोलो होते त्यावरून या मोहिमेला अपोलो असे नाव देण्यात आले होते.

१९५७ मध्ये रशियाचा ‘स्पुटनिक’ हा उपग्रह जेव्हा अवकाशात टिक टिक करू लागला.पुढे १२ एप्रिल १९६१ रोजी रशियन अंतराळवीर युरी गागारिन यांनी ‘वोस्टाक स्पेसक्राफ्ट’ या अंतराळयानातून पृथ्वीच्या कक्षा ओलांडून विस्तीर्ण अवकाशात झेप घेतली आणि पहिला अंतराळवीर बनण्याचा मान पटकावला होता तेव्हा अमेरिकी नेतृत्वाच्या म्हणजे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी १९७० पर्यंत माणसाला चंद्रावर पाठवण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी २५ मे १९६१ रोजी काँग्रेसपुढे एक भाषण केले होते.

त्यात त्यांनी अमेरिका रशियाच्या तुलनेत तंत्रज्ञानामध्ये मागे पडत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी त्या वेळी त्या दशकाच्या अखेरीस अमेरिकी माणूस चंद्रावर उतरला पाहिजे असे जणू आव्हानच दिले होते. मानवाचे चंद्रावरील पहिले पाऊल, त्या स्पर्धेतूनच पडले. २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे ‘अपोलो ११’ हे यान चंद्रावर पोहोचले. ही ऐतिहासिक मोहिम १६ जुलैला सकाळी नऊ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झाली होती. मानवाचे हे अवकाशारोहण जगातील दोन दशलक्ष लोकांनी दूरचित्रवाणीद्वारे पाहून डोळ्यात साठवून ठेवले.

अवकाश गतीने चंद्राच्या दिशेने झेपावले. चंद्राच्या कक्षात पोहोचल्यानंतर त्याने घिरट्या घालायला सुरवात केली.चंद्राला दहावी परिक्रमा केल्यानंतर यानाचा चालक नील आर्मस्ट्रॉंगने अपोलो यानाचा (कोलंबिया) दरवाजा उघडला आणि एका बोगद्यातून इगल या त्याला जोडलेल्या छोट्या यानात जाऊन पोहोचला. त्याच्या आदल्या दिवशीही त्याने इगलमध्ये जाऊन तेथील सर्व यंत्रे योग्य काम करतात की नाही हे पाहिले होते. इगलचे पोटात घेतलेले पाय उघडतात की नाही याचीही त्याने चाचणी घेतली होती. कारण प्रत्यक्ष हेच यान चंद्रावर उतरणार होते.

नीलनंतर एल्ड्रिन इगलमध्ये आला. तिसरा अंतराळवीर मायकल कॉलिन्स मात्र यानातच राहिला. सायंकाळी साडेसहा ते रात्री अकरापर्यंत एल्ड्रिनने यानाची संपूर्ण चाचणी घेतली. अपोलोच्या साथीनेच चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत राहिले. अकरा वाजून सतरा मिनिटांनी इगल अपोलोपासून वेगळे झाले. हे यान वेगळे झाल्यानंतर आर्मस्ट्रॉंगने गरूडाला (इगल) पंख फुटले, असा संदेश पृथ्वीवर पाठविला.आता इगल आणि कोलंबिया दोन्ही चंद्राचे उपग्रह बनल्यासारखे त्याच्याभोवती प्रदक्षिणा मारत होते.

यान चंद्रावर उतरल्यावर ह्युस्टनमधील प्रक्षेपण केंद्रावर जमलेल्या तमाम वैज्ञानिकांनी जल्लोष केला. जो-तो एकमेकांना सांगत होता, ‘आपला गरुड चंद्रावर उतरलाय.’ अपोलो यान चंद्रावर पोहोचल्यानंतर साडेचार तासांनी अंतराळवीर नील ऑर्मस्ट्राँग अवकाशयानातून बाहेर आले. आणि जगातील दुस-या ग्रहावर पाऊल ठेवणारे पहिली व्यक्ती ठरले. त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार जगभर गाजले. ते म्हणाले होते, ‘चंद्रावरील माणसाचे छोटेसे पाऊल असेल, परंतु अवघ्या मानवजातीसाठी ही फार मोठी झेप आहे.’ आर्मस्ट्राँग यांचे म्हणणे शब्दश: खरे ठरले. त्या पहिल्या चांद्र मोहिमेनंतर अवकाश संशोधनाला प्रचंड वेग आला.

आल्ड्रिन यांनीही त्यांची उत्कट भावना प्रत्यक्ष तिथे व्यक्त केली, ती म्हणजे ‘इतकी निर्जन, शांत जागा (मॅग्निफिसंट डेझोलेशन) पृथ्वीवर सापडणे कठीण आहे.’चंद्रावरून पृथ्वीकडे पाहताना काय वाटत होते या प्रश्नावर ते म्हणतात की, ‘कुठे अब्जावधी माणसांची गर्दी असलेली पृथ्वी व इथे तर आम्ही तिघेच होतो. आम्ही हा विजय तिथे साजरा करूही शकलो नाही.’ साधा विमानाचा प्रवास करायचा तरी अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. त्या तीन अंतराळवीरांचे काळीज लोखंडाचे असावे.

चंद्राचा प्रवास करायचा तर ती मरणयात्राच होती. चंद्र पृथ्वीपासून किती दूर आहे? तर ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. हा प्रवास त्या तीन चांद्रवीरांनी अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केला. गणित मांडून पाहा, चांद्रयान किती वेगाने गेले असेल? जेव्हा ते चांद्रवीर चंद्रावर उतरले तेव्हा ते चंद्रावर स्थिरपणे चालू शकत नव्हते. ते चंद्रावर अडीच तास होते. त्या काळात ते चंद्रावर जणू उडय़ा मारतच चालत होते. कारण चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी आहे व तिथे हवा नाही. त्या चांद्रवीरांनी ऑक्सिजन सोबत नेला होता. त्या अडीच तासात त्यांनी चांद्रभूमीवर अनेक प्रयोग केले. त्यांनी पृथ्वीवर परतताना सोबत ३८० किलो दगडमाती आणली.

त्याचे संशोधन आजही चालू आहे. २४ जुलै १९६९ रोजी परतीचे वाहन ‘कोलंबिया मोडय़ुल’ पृथ्वीवर परतले. अपोलो-११ मोहीम यशस्वी झाली व अध्यक्ष केनेडी यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. त्या अगोदर २७ जानेवारी १९६७ मध्ये अपोलो मोहिमेतील चांद्रवीर मरण पावले होते. अपोलो-१ सुद्धा उतरवताना गडबड होत आली होती, पण अवघ्या २० सेकंदांपुरते इंधन राहिले असताना ते सुखरूप उतरले. आर्मस्ट्राँग यांना जिवंतपणी दंतकथा बनण्याचे भाग्य लाभले.

कारण मनमोहक चंद्राला नील आर्मस्ट्रॉँग यांनी अगदी जवळून पाहिले होते. चांद्रमोहिमेनंतर मंगळ मोहीम झाली. या मोहिमांसाठी अफाट खर्च येतो. कशासाठी ग्रह-ता-यांचा शोध घ्यायचा, कशासाठी पैसा खर्च करायचा, असे प्रश्न विचारले जातात. ग्रह-ता-यांच्या अभ्यास मोहिमांमुळे समाजात वैज्ञानिक दृष्टी निर्माण होणार असेल व अंधश्रद्धा दूर होणार असतील तर असल्या मोहिमांवर होणारा खर्च सहन करायलाच पाहिजे.

चंद्रावर पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्राँग यांनी इंदिरा गांधी यांची माफी मागितली होती. मिशन अपोलो-११ ला १६ जुलै १९६९ ला कॅनेडी स्पेस सेंटर लॉन्च कॉम्प्लेक्स 39-ए मधून सकाळी ८:२० वाजता लॉन्च केले होते. नील आर्मस्ट्रॉंगने २० जुलैला चंद्रावर पाऊल ठेवले होते. ज्याला पाहण्यासाठी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळी ४:३० पर्यंत जागल्या होत्या आणि जेव्हा आर्मस्ट्रॉँगला याबाबत माहिती मिळाली, तेव्हा त्याने त्यांची माफी मागितली. माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी हा किस्सा सांगितला होता.

त्यांनी सांगितले होते की, चंद्रावरून पृथ्वीवर परतल्यानंतर नील आर्मस्ट्राँग आपल्या साथीदारासोबत जग भ्रमंती दरम्यान नवी दिल्लीत इंदिरा गांधींची भेट घेतली, तेव्हा नटवर सिंह उपस्थित होते. तिथे नटवर सिंह यांनी नील आर्मस्ट्राँग यांना इंदिरा गांधी सकाळी ४:३० पर्यंत जागल्याचे सांगितले. तेव्हा नील आर्मस्ट्राँग यांननी इंदिरा गांधींना झालेल्या असुविधेबद्दल खेद व्यक्त केला होता. तसेच पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला जास्त जागावे लागणार नाही, अशा वेळेस चंद्रावर जाउ असे सांगितले. मानवजातीच्या इतिहासात २० जुलै, १९६९ चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहीला गेला आहे.

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *