Lokmanya Tilak
- इन्फोमराठी

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील टिळक युग

लोकमान्य टिळक हे आधुनिक भारतातले देशभर पोचलेले पहिले राष्ट्रीय नेते होते. एका मराठी माणसाने हे स्थान मिळवावे ही आपल्या साठी निश्चितच अभिमानाची आणि गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचं योगदान वाखाणण्याजोगं आहे. ते फार मोठे पत्रकार-संपादक-लेखक-विचारवंत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे ते एक प्रवर्तक मानले जातात. त्यांची लोकप्रियता अफाट होती. त्यांना मंडालेच्या तुरूंगात पाठवण्यात आले तेव्हा मुंबईच्या गिरणी कामगारांनी स्वतःहून बंद पाळला होता.

आज शंभर वर्षांनंतर आपण विचार केला की लोकमान्यांनी आपल्यासाठी मागे काय ठेवले किंवा काय शिकवण दिली, तर ते आहे प्रखर राष्ट्रवाद ! राष्ट्राच्या शत्रू समोर मी कधीही झुकणार नाही. मोडणार नाही गरज पडली तर समोरील व्यक्तीला झुकवीन देखील आणि मोडीन देखील,हा स्वाभिमान लोकमान्यांनी तत्कालीन युवकांपुढे मांडला ! ह्याच प्रेरणेतून पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्रक्रांतीने परमोच्च बिंदू गाठला ! महापुरुष हे समाजाचे दीपस्तंभ असतात,दिशादर्शक असतात. लोकमान्य टिळक असेच दीपस्तंभ आहेत. ते आज नाहीत पण त्यांचे विचार शाश्वत आहेत.

ब्रिटिशांना पक्के ठाऊक होते की, टिळक हे जहाल मतवादी विचारांचे होते. जहाल विचार तरुणांना लगेच आकर्षित करतात. त्यामुळे ते तरुणांचे आदर्श होऊ द्यायचे नाही अशी धारणा ब्रिटिशांची होती त्यामुळे ते टिळकांना मोठे होऊ द्यायचे नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. त्यांच्यावर बारीक नजर ठेवायची. कारण हा सुद्धा सह्याद्रीचा छावा आहे. टिळकांना जितकं लोकांपासून दूर ठेवू तेवढा ब्रिटिश सरकारला फायदा,पण टिळक शेवटपर्यंत लोकांमध्ये राहिले, वावरले.

कारण ते लोकमान्य होते. कडक इस्त्रीचे कपडे घालून, छानछान पेहराव करून, गुलाबी गाल करून ब्रिटिशांची ‘हाजी हाजी’ करणाऱ्यातील टिळक नव्हते. कारण तसं करण्यात अनेक तत्कालीन भारतीय नेते आघाडीवर होते. ब्रिटिशांशी अधिकाधिक गोड बोलू ते आपल्यला आज ना उद्या स्वातंत्र्य बहाल करतील, अशी कमकुवत,घाबरट मानसिकता असणारे लोक त्या काळात देखील होते. “ब्रिटिश हे जुलमाने राज्य करत आहेत,त्यांनी भारतीयांना गुलाम बनविले आहे.त्यांच्याबद्दल किंचितही आदर बाळगू नये”, ही ठाम भूमिका लोकमान्यांची होती ज्या भूमिकेपासून लोकमान्य थोडे सुद्धा सरकले नाहीत. कणखरपणा ह्याला म्हणतात!

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.” या शब्दात इंग्रजांना खडसावणारे  बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य  टिळक)  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य सनातनी राजकीय पुढारी होते. तसेच ते गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, वकील, शिक्षक, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणून ही प्रसिद्ध होते आणि अजुनही आहे.

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.

त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला.

तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्यूपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.

इ.स. १८७२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी व्यायामशाळेला जाऊन नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले.

कुस्ती, पोहणे व नौकाचालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यास झाला.

त्याप्रमाणे १८८० साली ‘न्यू इंग्लिश स्कूलची’ स्थापना झाली. तिथेही त्या शाळेचे व्यवस्थापक शिक्षक झाले. त्याबरोबरच सर्वसामान्य लोकांपर्यंत राष्ट्रीय विचारधारा पोहोचण्यासाठी वर्तमानपत्र हे उत्तम माध्यम आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ते जास्त परिणामकारक ठरणार आहे म्हणून केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं आणि टिळक आणि आगरकर यांचा राजकारणात प्रवेश झाला.

त्या काळात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशात दोन प्रवाह होते. ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र बंड करून स्वातंत्र्य मिळवावे अशा विचारांच्या क्रांतिकारकांनी आत्मार्पण करून ते हुतात्मे झाले होते. तर विचाराने लढा द्यावा असा दुसरा प्रवाह होता. ज्या काळात पाश्चात्य समाजात नवीन विचार, नवीन सुधारणा होत होत्या, त्या काळात हिंदुस्थानातील समाजजीवन मात्र अज्ञान आणि संकुचित मार्गात अडकले होते. त्यासाठी भारतीयांनी आधुनिक दृष्टी स्वीकारून प्रगती केली पाहिजे.

शिवाजी महाराजांच्या स्वरूपात त्यांना अशी आदर्श व्यक्ती मिळाली, की जिच्या अनुकरणाने लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला. शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श होते. या कारणांनी त्यांनी महाराष्ट्रात शिवजयंतीची सुरुवात केलीच, शिवाय भारतभर दौरे करून लोकांना शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विशेषतः बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव जोराने सुरू झाला.

टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते.

त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले. या दृष्टीने भारतातील विविध भागातील राजकीय संस्था, गट, व्यक्ती यांना एकत्र आणून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट व्हाव्या या उद्देशाने अखिल भारतीय राजकीय संघटना काँग्रेसची स्थापना होऊन २८ डिसेंबर १८८५ मध्ये मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये पहिले अधिवेशन भरले.

भारतातील विविध प्रांतातून ७२ प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. यातूनच नंतर त्याचे राष्ट्रव्यापी व्यासपीठ बनले आणि गुलामगिरी नष्ट करण्याचे आणि स्वातंत्र्य मिळविण्याचे ते प्रभावी साधन ठरले. इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणाऱ्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते.

एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले. 

१८९६ मध्ये मुंबई इलाक्यामध्ये भीषण दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची कायदेशीर जबाबदारी सरकारवर आहे यावर टिळकांनी भर दिला. प्रत्यक्ष पाहणी करून १५ डिसेंबर १८९६ च्या केसरीत टिळकांनी लिहिले, तुम्हाला या सरकारशी लढायचे असेल तर कायदेशीर मार्गानेच लढले पाहिजे. तरच आपले हक्क मिळतील. वेळ आली तर त्यासाठी गोळीबार सहन करण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. या संघर्षात लोकांना मदत करणे हे पुढा-याचे कर्तव्य आहे. टिळक हे कायद्याच्या सर्व मर्यादा सांभाळून लिहीत.

परंतु त्यांची भाषा जळजळीत असे. त्या भाषेमुळे लोक निर्भय बनले आणि सरकारी सत्तेला आव्हान देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येऊ लागले. टिळकांच्या या उपक्रमामुळे सरकार अस्वस्थ होऊन त्यांच्या चळवळी थांबवून मुस्कटदाबी करण्याची संधी शोधत होते. आणि तशी संधी त्यांना १८९७ मध्ये पुण्याला प्लेग झाल्यावर मिळाली. लोकांवर इतके अत्याचार झाले की चाफेकर बंधू रँड आणि आयस्र्ट या जुलमी अधिका-यांचा खून करून फाशी गेले. तेव्हा टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा अग्रलेख लिहिला.

हा लेख आणि त्यांचे पूर्वीचे लेख, भाषणे ही राजद्रोह आहेत असे ठरवून २९ जुलै १८९७ या दिवशी त्यांना अटक करून दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. राजद्रोहासाठी सक्त मजुरीची शिक्षा भोगणारे टिळक हे भारताच्या प्रतिष्ठेचे आणि आकांक्षाचे प्रतीक बनले. लोकांच्या हृदयात त्यांना अढळ स्थान लाभले आणि ते लोकमान्य झाले. तुरुंगात त्यांना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे वागवण्यात आले. दोन महिन्यांत त्यांचे ३० पौंड वजन कमी झाले. सर्व देशवासीयांना चिंता वाटू लागली. लोकमान्य टिळक केसरीचे संपादक आणि क्रीयाशील राजकीय नेते होते.

परंतु या व्यापातूनही ते आपल्या आवडीच्या विषयासाठी व संशोधनासाठी वेळ काढत होते. त्यांनी अनेक विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिले होते. त्यांच्या गाढय़ा व्यासंगाविषयी आणि संशोधनाविषयी युरोपियन मान्यवर विद्वान त्यांना अतिशय मान देत प्रो. मॅक्समुल्कर यांनी एक निवेदन तयार करून त्यावर युरोपातील नामवंत संशोधकांच्या सह्या घेऊन ते भारत मंत्र्यांना सादर केले. त्यात टिळकांच्या मौलिक संशोधनाचा उल्लेख करून त्यांची सुटका करावी, अशी विनंती केली. अखेर ६ सप्टेंबर १८९८ या दिवशी त्यांची सुटका झाली.

टिळकांनी नेतृत्वावर टीका न करता चळवळीच्या पलीकडे नेणारा राजकीय कार्यक्रम हाती घेतला. लोकांना स्वराज्यासाठी फार मोठा त्याग आणि अग्निदिव्य करावे लागेल याची जाणीव करून दिली. त्यांचा सशस्त्र चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नव्हता; परंतु केसरीतून प्रसिद्ध होणा-या लेखामुळे संतापून ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरवण्याचे ठरवले आणि २४ जून १९०८ या दिवशी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. टिळक दोषी आहेत असा बहुमताने निर्णय दिला.

शेवटी टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन टिळकांना सहा वर्षे ब्रह्मदेशातील मंडाले येथे नेले. टिळकांनी कारागृहात रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ केवळ चार महिन्यांत पूर्ण केला. मंडाले येथून सुटल्यावर ‘पुनश्च हरी ओम्’ ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणजेत मालवली. 

लोकमान्य टिळकांनी जी शाश्वत मूल्ये मांडली. त्यांचे तेज अजून चमकत आहे. लोकमान्य ही उपाधी मिळालेला एकमेव पुढारी म्हणजे टिळक आणि खरोखरच ते होतेच “लोकमान्य”! महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात टिळक “लोकमान्य” होते. त्यांचे नेतृत्व संपूर्ण देशाने मान्य केले होते. इतके थोर कार्य त्या काळी करणे ही बाब सोपी नव्हती. त्यांनी भारतात आधुनिक राजकारणाचा पाया रचला. व्हॅलेंटिन चिरोलने त्याच्या ‘Indian Unrest’ पुस्तकात टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले होते आणि एकूणच ब्राह्मण (विशेषकरून चित्पावन) समाजाविरूध्द आक्षेपार्ह विधाने केली होती. टिळकांनी त्याच्यावर खटला भरला होता.

आणि ह्याच चिरोल केसच्या कामाने टिळक १९१८ मध्ये लंडनला आले होते. टिळक लंडनला आले असताना लंडनमध्ये वेस्टमिन्स्टरमधील ज्या घरात (10 Howley Place, W2) राहिले होते त्या घरावर इंग्लिश हेरीटेजने त्यांच्या नावाची निळी पाटी लावलेली आहे आणि त्यात त्यांचा ‘लोकमान्य’ असाच उल्लेख आहे! या संदर्भातील माहिती आम्हाला डॉ संकेत कुलकर्णी यांच्या कडून मिळाली.

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *