Lala Lajpat Rai
- इन्फोमराठी

सिंहासारख्याच शूर पंजाब केसरी लाला राधाकिशन लजपतराय

लालाजींना ‘पंजाब केसरी’ म्हणूनही गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी १९२८ मध्ये ‘सायमन कमिशनवर’ सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लजपतरायांनी मांडला होता, नोव्हेंबरच्या सुरुवातीस पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनी निदर्शनाचे नेतृत्व केलं, जमाव पांगवण्यासाठी ब्रिटीशांनी मोर्च्यावर लाठीहल्ला केला.

लालाजींवरही लाठीहल्ला करण्यासाठी ब्रिटीश जराही कचरले नाही. लाठी हल्ल्यात झालेल्या जबर मारहाणीने १७ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. पण लालाजींचे बलिदान क्रांतीकारकांनी व्यर्थ जाऊ दिले नाही, त्यांच्या बलिदाननंतर स्वातंत्र्याची चवळवळ अधिक प्रकर्षाने वाढू लागली.

लालाजींचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके गावात २८ जानेवरी १८६५ मध्ये झाला. लहानपाणापासूनच ते अत्यंत हुशार होते. अरबी, उर्दू अशा अनेक भाषांचे त्यांना सखोल ज्ञान होतं. एल्एल्‌. बी. ची पदवी मिळवलेले लालाजी अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून नावारुपास आले. बाल विवाह, हुंडा यांना त्यांनी कडाडून विरोध केला.

स्त्री शिक्षणाचे ते समर्थक होते. बंगालच्या विभाजनाला लालांजींनी तीव्र विरोध केला. लाला लजपत रायांनी राष्ट्रीय काॅंग्रेस च्या १८८८ आणि १८८९ या वार्षिक सत्रा दरम्यान प्रतिनीधी म्हणुन सहभाग घेतला, पुढे १८९२ साली न्यायालयात सराव करण्याकरीता ते लाहौर येथे गेले. या ठिकाणी त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक व लक्ष्मी विमा कंपनी ची पायाभरणी केली.

त्यांच्या निष्पक्ष स्वभावामुळे त्यांना हिसार नगरपालीकेचे सदस्य नियुक्त करण्यात आले यानंतर ते सचिव देखील झाले. बाळ गंगाधर टिळकांनंतर लाला लजपत राय त्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते ज्यांनी पुर्ण स्वराज्याची मागणी केली होती.

पंजाब च्या सर्वात लोकप्रीय नेत्यांमधे लाला लजपतराय यांची गणना होऊ लागली. स्वातंत्र्य सैनिक लाला लजपत राय हे १८८२ साली पहिल्यांदा आर्य समाजाच्या लाहौर वार्षिक उत्सवामधे सहभागी झाले. या सम्मेलनाने ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी आर्य समाजात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

लाला लजपतराय ज्यावेळी हिसार येथे वकीली करीत होते त्या काळात काॅंग्रेस च्या बैठकांना ते उपस्थित राहात असत. १८८५ साली जेव्हां काॅंग्रेस चे पहिले अधिवेशन मुंबई ला झाले त्या वेळी लाला लजपत राय यांनी मोठया उत्साहाने यात सहभाग घेतला होता. त्यांच्या कार्याला पाहाता १९२० साली त्यांना नॅशनल काॅंग्रेस चे प्रेसिडेंट म्हणुन नियुक्त करण्यात आले. लाला लजपत राय अश्या व्यक्तिमत्वाचे धनी होते की त्यांना कुणालाही प्रभावीत करण्याची क्षमता त्यांच्यात होती व देशसेवा करण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती. ते एक प्रामाणिक देशभक्त होते.

यामुळेच ते हिसार वरून लाहौर येथे स्थायीक झाले. या ठिकाणी पंजाब उच्च न्यायालय होते. येथे राहुन समाजाकरता त्यांनी अनेक विधायक कामं केलीत. लालाजींना पंजाबचा सिंह म्हणून गौरविण्यात येऊ लागले. त्यांच्या कारावासाच्या काळात त्यांच्या अनेक अनुयायांनी सौम्य धोरण अवलंबून लोटांगणवादी भूमिका घेतली. त्याची दुःखद जाणीव त्यांना सुटकेनंतर झाली. काही शिखांनी तर अजितसिंग हे शीख नव्हतेच, असे पत्रक काढले.

आर्यसमाजी नेत्यांनी आपले राजकारणाशी काहीही कर्तव्य नाही असे वारंवार घोषित केले. त्यामुळे महिन्याभराने भरलेल्या सुरत काँग्रेसचे अध्यक्ष व्हा, असा प्रस्ताव पंजाबबाहेरील जहाल नेत्यांनी मांडला. त्याला लालाजींनी संमती दिली नाही. हद्दपारीच्या कालात गोखल्यांनी सतत त्यांची बाजू मांडली असल्यामुळे आपले जहाल समर्थक आणि मवाळ गट यांच्यात तडजोड करण्याची त्यांनी शिकस्त केली. त्यामुळे मनाने व वृत्तीने जहाल पण शरीराने मवाळ गटात अशी सुरतला काँग्रेस दुभंगल्यावर लालाजींची अवस्था झाली.

पुढील वर्षी गदरचे संस्थापक हरदयाळ आणि जहाल नेते खापर्डे व पाल यांच्यासह ते इंग्लंडला गेले. गदर क्रांतीचे प्रत्यक्ष संचालन करणारे लालाजींचे आप्त रामचंद्र पेशत्वरी त्यावेळी कारावासात होते. नवीन सुधारणा कायदा झाल्यावर लालाजी परत आले. गोखल्यांच्या भारत सेवक समाजाच्या धर्तीवर त्यांनी पंजाबमध्ये पीपल्स सोसायटी काढली. आर्य समाजाच्या दयानंद कॉलेजातील जहाल देशभक्तीचा भर ओसरलेला पाहून राष्ट्रीय कॉलेज काढले.

महायुद्ध सुरू झाल्यावर ते आपले चिटणीस डॉ. हर्डीकर यांना घेऊन अमेरिकेस गेले. तेथे त्यांचे पैशाअभावी फार हाल झाले. शेवटी लोकमान्य टिळकांनी त्यांना १५,००० रुपये धाडले. याशिवाय त्यांनी संपुर्ण देशात स्वदेशी वस्तु स्विकारण्याकरता एक अभियान चालवले. १९०५ मध्ये ज्यावेळी बंगाल चे विभाजन करण्यात आले त्याचा त्यांनी कडाडुन विरोध केला आणि या आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला.

जालियनवाला बाग हत्याकांडाने व्यथित होऊन १९२० मध्ये लजपतराय परत आले. खिलाफत आंदोलनाला तात्त्विक विरोध असूनही त्यांनी जुळते घेतले. त्या सालाच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद सर्वानुमते त्यांना देण्यात आले. सैनिकांत बहिष्काराचा प्रचार करण्यासाठीच्या उच्च समितीवर लालाजींची नियुक्ती झाली. नोव्हेंबर १९२१ मध्ये त्यांना अटक होऊन शिक्षा झाली. प्रकृती खालावल्याने लवकर सुटका झाली.

मोतीलाल, चित्तरंजन दास यांबरोबर ‘फेर’ गटात राहून त्यांनी स्वराज्य पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. खिलाफत आंदोलनात मलबारमध्ये माथेफिरू मोपल्यांनी भीषण दंगली केल्या व आक्रमक मुस्लिम जातीयवाद उफाळून आला. त्याची प्रतिक्रिया होऊन बऱ्याच राष्ट्रीय नेत्यांनी हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन केले. १९२५ च्या पहिल्या अधिवेशनाचे लालाजी अध्यक्ष होते. १९२६ नंतर स्वराज्य पक्षाने असेंब्लीवर बहिष्कार घातला. 

इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन ऊर्फ सायमन कमिशन हे १९२७ साली ब्रिटिश भारताच्या वसाहतींत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाची निर्मीती १९१९ या कायद्याप्रमाणे झाली,या कायद्यानुसार दर दहा वर्षांनी रॉयल कमिशनच्या नेमणुकीची तरतुद होती.

१९१९ च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहीर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांच्या आडनावावरून बऱ्याचदा या आयोगास सायमन कमिशन असे उल्लेखले जाते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. सायमन कमिशनचा विरोध शांततेने करण्याची लालाजींच्या ईच्छा होती.

त्यांचे म्हणणे असे होते की जर कमिशन पैनल मधे भारतीय राहु शकत नाहीत तर या कमिशन ने भारतातुन परत जावे. परंतु ब्रिटीश सरकार त्यांची ही मागणी मानण्यास तयार नव्हते आणि या उलट त्यांनी लाठीचार्ज सुरू केला या अमानुष लाठीचार्ज मधे लाला लजपत राय गंभीररित्या जखमी झाले. जखमी होऊन सुद्धा लाला लजपत रायांनी या जमावासमोर भाषण केले.”आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटीश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो.” हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.

या घटनेमुळे त्यांचे मनोबल खचले होते व त्यांची प्रकृती देखील खालावत गेली आणि १७ नोव्हेंबर १९२८ रोजी स्वराज्याचा हा उपासक आपल्यातुन कायमचा निघुन गेला. भारताच्या स्वातंत्र्याचा हा महानायक लाला लजपत राय. यांचे जिवन म्हणजे संघर्षाची महागाथा आहे. आपल्या जीवनात देशाकरीता अनेक लढाया त्यांनी लढल्या. देशाची निरंतर सेवा केली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरीता अथक परिश्रम केले. त्यांच्या त्यागाला हा देश निरंतर स्मरणात ठेवेल.

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *