umaji naik
- इन्फोमराठी

इंग्रजांचा कर्दनकाळ आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक

भारतामध्ये ब्रिटीश राजवटी विरुद्ध पहिली क्रांतीची बीजे पेरणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे इंग्रजांच्या दृष्टीने शत्रू होते. परंतु त्यांच्या शौर्याची दरवल घ्यायलाच हवी. अशी कॅप्टन मॅकिव्टॉसची दिलदार भूमिका होती. मॅकिव्टॉसला राजे उमाजी नाईकांमध्ये अनेक गुण आढळले त्यांच्या मॅकिव्टॉस वर प्रभाव पडला होता. त्याच्या मते राजे उमाजी नाईक हे शूरवीर योध्दा होतेच. आणि विशेष म्हणजे ते निर्व्यसनी होते.

राजे उमाजी नाईक हे एकपत्नी आणि स्त्रियांचा आदर करणारे राजे होते.ते निर्लोभी आणि उदार होते.राजे उमाजी नाईक हे एक रुबाबदार व्यक्तिमत्व होते. त्यांच्या चेहऱ्यावर कधीच भय आणि चिंता दिसली नाही. परंतु त्यांच्या बालीदानाबरोबरच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांची गुण वैशिष्ट्ये त्यांचे शौर्य काळाच्या पडद्याआड गेले होते. म्हणूनच तर एक ब्रिटीश अधिकारी असणाऱ्या कॅप्टन मॅकिव्टॉसला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचा इतिहास आजरामर ठेवायचा होता.

पुढे सन १८३३ मध्ये कॅप्टन मॅकिव्टॉसने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आणि रामोशी समाजावर आधारित एक पुस्तक लिहिले. आणि विशेष म्हणजे हे पुस्तक आजही कॅलिफोर्निया विद्यापीठात आभ्यासाला आहे. गुगलसारख्या आंतरराष्ट्रीय वेबपोर्टल नेही या पुस्तकांचे संवर्धन केलेले आहे.या पुस्तकामध्ये कॅप्टन मॅकिव्टॉसने अगदी सहज आणि स्पष्ट शब्दामध्ये म्हटले आहे कि “राजे उमाजी नाईकांना आम्ही वेळीच आवरले नसते तर भारतातील ते दुसरे छत्रपती शिवाजी (प्रतिशिवाजी) ठरले असते.

“ब्रिटीश अधिकारी कॅप्टन मॅकिव्टॉसने स्वतः उद्गारलेल्या या एकाच वाक्यामध्ये राजे उमाजी नाईकांच्या शौर्याची कल्पना आपल्याला येईलच त्या वेळीच जर राजे उमाजी नाईकांच्या या ब्रिटीश राजवटी विरुद्धच्या लढ्याला जर आपल्या देशातील संस्थानिकांनी बळ दिले असते तर देशाचा इतिहास कदाचित वेगळा असता. 

स्वातंत्र्यासाठी सुरू झालेला यज्ञ ‘जयहिंद’च्या गर्जना करत १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी पूर्ण झाला. या यज्ञात वेगवेगळय़ा मार्गानी अनेकांनी आपलं लौकिक जीवन समर्पित केलं. काहींनी स्वतंत्र हिंदुस्थानचा जयजयकार करत स्वातंत्र्याचा प्रचार केला. काहींनी तुरुंगवास पत्करला. हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद  झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो कि पळो करून सोडणारा व  सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा  महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.

तो म्हणजे ‘उमाजी नाईक’. काहींनी शस्त्रास्त्रांची जमवाजमव करून इंग्रजांच्या शत्रूशी हातमिळवणी करत स्वातंत्र्याचा लढा चालूच ठेवला. तर काहींनी जुलमी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कंठस्नान घालून यमसदनाला पाठवले. अनेक ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत ‘वंदे मातरम्’च्या घोषात फाशीचे दोर गळय़ात अडकवून ते स्वातंत्र्य यज्ञातील समिधा झाले.

स्वतंत्र वृत्ती आणि स्वामीनिष्ट असलेल्या रामोशी जमातीत जांभुळवाडीच्या दादोजी खोमणे यांच्या घरात १७९६ मध्ये उमाजी नाईक यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. उमाजीच्या वडिलांचे नाव बाबाजी नाईक होते. लहानपणापासूनच उमाजी तालमीत खेळणारा, नेमबाजीत तरबेज असलेला स्वाभिमानी तरुण होता. पुरंदर किल्ल्याच्या परिसरात तो राहात होता. ब्रिटिशांनी या रामोशी जातीला गुन्हेगार ठरवले होते.

त्यांना चरितार्थासाठी शेती किंवा दुसरा कुठलाही उद्योगधंदा नव्हता. सरळ मार्गाने ब्रिटिश सरकार त्यांना जगू देत नव्हते. त्यामुळे पोट भरण्यासाठी लुटालूट करणे याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. पूर्वी पेशव्यांनी रामोशींची वतने रद्द करून त्यांना पुरंदरगड खाली करण्याचा हुकूम दिला होता. १८०४ मध्ये जांभूळवाडीवर त्यांच्यावर हल्ला झाला तिथून त्यांना हुसकावून लावले होते. त्यामुळे त्यांनी निजामाच्या हद्दीत स्थलांतर केले.

पण उमाजीला आपल्या परिस्थितीची जाणीव झाली. शिवरायांना आपला आदर्श मानून त्यांनी विठूजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी आणि बाबू सोलस्कर यांना सोबत घेऊन कुलदैवत जेजुरी खंडोबाच्या चरणी शपथ घेतली की, स्वराज्यावर पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करून देणार नाही, आणि इंग्रजांविरुद्ध पहिल्या बंडाची घोषणा झाली. तेव्हा आपले स्वातंत्र्य मिळविण्याचा त्याने निर्धार केला.

त्यासाठी जातीतील लोकांना एकत्र करून जागृत केले. रामोशी खंडोबाचे भक्त होते. म्हणून खंडोबाच्या साक्षीने लोकांना सांगितले की आपले गेलेले वतन, स्वातंत्र्य मिळवायचे आहे. आपण तयार व्हा. त्यासाठी काहीही करायची आपली तयारी हवी आणि त्याने इंग्रज सरकारविरुद्ध बंडाचे निशाण उभारले. इंग्रजांना देशातून हाकलून देण्याचा संकल्प केला होता. तेव्हा सामान्य लोकांना त्रास न देता ब्रिटिश सत्तेला हादरा देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला.

सातारा जिल्ह्यात चित्तुरसिंग याच्या नेतृत्वाखाली तर सासवड भागात नाईक पुरंदर भागात स्वत: उमाजी नाईक यांनी लुटालूट सुरू केली. १८२४ मधल्या फेब्रुवारीत कडेकोट बंदोबस्त असूनही भांबुडर्य़ाची तिजोरी लुटली. मिरज पटवर्धनांची मंडळी पुण्याला जात होती. त्यांच्यावर अचानक छापा घालून मोठा ऐवज मिळवला. १८२६ सालीच्या एप्रिल महिन्यात पंढरपूर-पुण्याला जाणा-या सावकाराला लुटून त्याची मालमत्ता ताब्यात घेतली. ऑक्टोबर महिन्यात जेजुरीच्या पोलीस चौकीवर हल्ला करून बंदुका पळवल्या.

इंग्रजांनी उमाजीला पकडून देण्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले. बक्षिसाच्या आशेने शिवनाकने उमाजीला पकडून देण्याचा डाव आखला. तो उमाजीने त्याच्यावरच पलटवला. त्याला पकडून तलवारीने त्याचे तुकडे केले. ब्रिटिशांनी उमाजीच्या रामोशी जातीला गुन्हेगार ठरवले होते त्याचा उमाजीला संताप होता. म्हणून ब्रिटिशांना घालवून आपले राज्य स्थापन करण्याचा त्याचा संकल्प होता. त्याच्यापुढे शिवाजी महाराजांचा आदर्श होता. म्हणूनच त्याने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते. पण सर्वसामान्य लोकांना कुठलाही उपद्रव होणार नाही याची तो काळजी घेत होता.

एका शेतक-याला त्याची गहाण ठेवलेली जमीन सोडवून घेण्यासाठी मदत केली. एका शेतक-याला रोख रक्कम दिली. एका लग्नाच्या व-हाडातील गरीब वधू-वरांना आपल्या जवळचे दागिने दिले. इतकेच नव्हे तर घनदाट जंगलातून जाणा-या या वधू-वरांना आपले सहकारी मदतीला देऊन सुखरूप घरी पोहोचवले. ब्रिटिश सत्ता देशातून घालवून देणे हे उमाजीचे ध्येय होते. शिवाजी महाराजांचे जसे तानाजी बाजी साथी होते. त्याप्रमाणे भुजबा पांडय़ा हे उमाजीचे साथी होते. त्यांच्या मदतीनेच उमाजीने आपले स्वराज्य स्थापन केले. स्वत:चे एक निशाणही ठरवले. राज्याच्या खर्चासाठी खंडणी गोळा केली.

स्वत:ला राजा समजून ब्राह्मणांना दक्षिणा वाटली. लोकांनी सरकारचे मामलेदारास वसूल देऊ नये. एक पै देखील भरल्यास त्यांची घरे जाळून राखरांगोळी करण्यात येईल, असा हुकूम केला.उमाजीने आपल्या स्वराज्यात दरबार भरवण्यास सुरुवात केली. लोकांना त्याने कधीही त्रास दिला नाही. त्यामुळे लोक त्याला मानत होते. त्याला पकडण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत असताना तो सुरक्षित राहावा म्हणून सर्व लोक त्याची काळजी घेत होते.

दिवसेंदिवस उमाजी आपल्या राज्याचा विस्तार करत होता. ठिकठिकाणी चौक्या बसवल्या होत्या. भोगा, पांडू, कृष्णा, अमृता, सत्तू, येसाजी यांच्या स्वतंत्र लहान लहान टोळय़ा होत्या. त्या हेरगिरी व टेहळणीची कामे करत. राज्य चालविण्यासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे पुण्यातील वाडय़ावर हल्ले करून लुटालूट करत होता. लुटीमधला काही भाग त्याने दानधर्मासाठी खर्च केला. सत्तू नाईकाची स्वतंत्र टोळी होती. पण उमाजीचा उद्देश कळल्यावर उमाजीला आपला खरा नेता मानून मुजरा केला आणि आपले साथीदार त्याच्या स्वाधीन केले.

कॅ. रॉबर्ट्सन याने पाटील कुलकर्णी या वतनदारांना आणि रामोजीच्या सहकाऱ्यांना वेगवेगळय़ा प्रकारची लालूच दाखवली. पण कुणीही असोत, ते जेथे सापडतील तेथे त्यांना पकडून ठार मारावे. साहेबास ठार मारण्याचे काम जो उत्कृष्टपणे करेल त्याला नव्या सरकारातून रोख बक्षिसे, इनामे जहांगि-या देण्यात येतील. इंग्रजी राज्यात ज्यांची वतने, हक्क, मिळकती बुडाल्या असतील, त्यांना आपले हक्क मिळविण्याची संधी आली आहे.

तिचा उपयोग करून घ्यावा. कंपनी सरकारच्या फौजेत हिंदी शिपाई स्वार पायदळ आहे. त्यांनी नोक-या सोडून बाहेर पडावे. साहेबाचे हुकूम मानू नयेत. ही आज्ञा न पाळल्यास नवीन सरकार त्यांना शिक्षा करील. फिरंग्यांचे बंगले जाळावेत. सरकारी तिजो-या लुटाव्यात. लुटीचा पैसा त्यांना माफ केला जाईल. सरकारात वसूल भरू नये. सगळयांनी आमचाच हुकूम मानावा. इंग्रजी राज्य बुडणार आहे असे जे भाकीत आहे ते खरे होण्याची हीच वेळ आहे.

इंग्रज, सावकार, मोठे वतनदार यांना उमाजी यांनी लुटून गोरगरिबांना मदत केली. स्वराज्याच्या आया-बहिणींवर वाकडी नजर टाकणाऱ्याला उमाजी यांनी चांगलाच धडा शिकवला. उमाजी करत असलेला लढा बघून जनता देखील त्यांच्या सोबत येऊ लागली. त्यामुळे त्यांचा लढा अधिक व्यापक आणि इंग्रजांना तापदायक ठरू लागला. इंग्रजांनी पुरंदर, सासवडच्या मामलेदारला फर्मान सोडले की, उमाजींना कैद करा. म्हणून  मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन निघाले आणि पुरंदरच्या पश्चिमेला एका खेड्यात उमाजी आणि इंग्रज यांच्यात मोठे युद्ध झाले.

त्यात इंग्रजांना पराभवाला सामोरे जावे लागले. उमाजीने इंग्रज अधिकाऱ्यांची छाटलेली मुंडकी मामलेदाराकडे पाठवली. हे पाहून इंग्रज अधिकच संतापले. उमाजी आपल्या पाच हजार  सैन्यासोबत डोंगरात टोळी करून राहत होते. त्यांच्या मागावर येणाऱ्या इंग्रजी सैन्याला गडावरून गोफणि आणि बंदुका चालवून उमाजीचे सैन्य घायाळ करून पुन्हा पाठवून देई.

काहिकांचे प्राण देखील यात गेले. उमाजीने फर्मान पण काढला की, सर्वांनी इंग्रजांच्या नोकऱ्या सोडून द्यावा. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन या परीने लढा द्यावा. त्यांचे खजाने लुटावे, त्यांना शेतसारा देऊ नये, अश्याने त्यांची राजवट लवकरच संपुष्टात येईल आणि एक नविन सरकार उदयास येईल. असा फर्मान काढून एक प्रकारे स्वराज्य स्थापनेचा पुकारच उमाजीने केला.

उमाजीचा हा जाहीरनामा म्हणजे ब्रिटिश सत्तेला मोठेच आव्हान होते. १८२९ मध्ये सरकारने त्याच्याशी समझोता केला. त्याला १२० बिघे जमीन दिली. नाईक ही पदवी दिली. त्याच्यावरचे गुन्हे माफ केले. त्याच्या जातीतील काही साथीदारांना नोक-या दिल्या. काही काळापुरते त्याने ते मान्य केले. पण त्यात त्याला समाधान नव्हते. त्याने जे स्वतंत्र निर्णय घेतले होते, त्यासाठी त्याला इशारा देण्यात आला. त्याच्याकडून माफीनामा लिहून देण्यात आला.

पुण्याला त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले. १६ डिसेंबर १८१० मध्ये उमाजी नजरकैदेतून सुटला. त्याच्या एकटय़ाच्या कार्याचा झंझावात सुरू झाला. इतर राजे, संस्थानिक यांची मदत नव्हती. कारण ते सर्व इंग्रजांचे आश्रित झाले होते. त्यांच्या टोळय़ा लुटालूट करत होत्या. पण उमाजीला पकडून देण्यासाठी ४०० बिघे जमीन आणि दहा हजार रुपये रोख असे प्रचंड बक्षीस जाहीर झाले. त्याचा लोभ सुटून नाना रामोशी इंग्रजांना फितूर झाला. या फितुरीनेच अनेकांचा घात केला. अशी अनेक उदाहरणे इतिहासात साक्ष देतात.

नानाने उमाजीला बापू सिंगावर हल्ला करण्याचा सल्ला दिला. नाना आपलाच माणूस आहे. या विश्वासाने त्याने तो सल्ला मानला आणि फसला. त्याचा विश्वासघात झाला होता. चोरी, दरोडे, बंड, सरकारी द्रोह असे अनेक आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली. फाशी देण्यापूर्वी अखेरची इच्छा विचारली तेव्हा तो त्वेषाने म्हणाला, ‘तुम्ही इंग्रजांनी चालते व्हावे’ ३ फेब्रुवारी १८३४ या दिवशी उमाजी फाशी गेला. एक धगधगती ज्वाला कायमची विझली. विशेष म्हणजे कॅ. मॅकिन्टाश याने या स्वातंत्र्यानं भारलेल्या पराक्रमी विराची जीवनगाथा लिहिली आहे. अशा या शूरविराला कोटी कोटी प्रणाम. इतिहासात तुम्ही कायम अमर राहाल.

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *