netaji subhash chandra infomarathi
- इन्फोमराठी

भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान

आपला भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यात अनेक क्रांतीकारक देश भक्तांचा फार मोठा वाटा आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस हे त्यातलेच एक मोठे नाव  देशावर प्रेम म्हणजे कोणत्या प्रकारचे आणि किती.? मना पासून देशावर प्रेम करणे, देश आपलाच मानणे, देशाचा मान तोच माझा मान, देशाचा अपमान तोच माझा अपमान.

नेताजी कॉलेज मध्ये शिकत असताना एका इंग्रजी प्राध्यापकाने शिकवताना भारताची टवाळी केली. नेताजींना ते सहन झाले नाही. ते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी त्या प्राध्यापकाच्या थोबाडीत मारली. परिणाम म्हणून सुभाष बाबूंना कॉलेज मधून काढून टाकले. मग आशुतोष मुख्रर्जीनी मध्यस्थी केली. आणि परत कॉलेज मध्ये घेतले. असे नेताजींचे देशावर अतिशय मनापासून प्रेम होते.

कटक येथील नामवंत वकील  बोस व प्रभावतीदेवी या सुशिक्षित व सुसंस्कृत दाम्पत्याच्या पोटी २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे सुभाषचंद्र यांचा जन्म झाला. सुभाषचंद्र यांचे प्राथमिक शिक्षण युरोपियन शाळेत झाले. तेथे असलेल्या वातावरणाचा खोल परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडला. ते स्वतः धार्मिक असले तरी धर्माच्या नावावर चाललेल्या ढोंगावर त्यांचा विश्वास नव्हता.

देवनशा शाळेत मॅट्रिकची परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी कोलकत्याच्या प्रेसिडेंट कॉलेजमध्ये प्रवेश केला. पण त्यावेळी ते अध्यात्मिक विचारांकडे झुकले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. याच विचारात ते गुरूच्या शोधात सोळा-सतरा वर्षाच्या वयात हिमालयात निघून गेले. चांगला गुरू त्यांना मिळाला नाही. पण स्वामी विवेकानंद यांच्या सानिध्यात राहून त्यांनी रामकृष्ण मिशन संदर्भात माहिती घेतली.

त्यांच्या आई-वडिलांनी इंग्लंडला जाऊन आयसीएस करण्याचा सल्ला दिला. पण त्यावेळी वातावरण सरकारविरोधात होत होते. गांधीजींचे असहकार आंदोलन जोर पकडत होते. जालियनवाला बाग हत्याकांडाचा संताप अजूनही शांत झालेला नव्हता. अशावेळी सुभाषचंद्र यांचे रक्त तापत होते. या आंदोलनात उडी घेण्याची त्यांची इच्छा होती. शेवटी मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या सल्ल्यामुळे अखेर आयसीएस करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. 

१९२० मध्ये ते आयसीएस उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी घरच्यांना पत्र लिहिले. दुर्देवाने या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो आहे. पण मी प्रशासकीय अधिकारी बनणार की नाही हे मी सांगू शकत नाही. मला असे वाटते की मी माझा देश आणि ब्रिटिश साम्राज्य या दोघांची सेवा एकावेळी करू शकणार नाही. लवकरच मला यापैकी एक निवडावे लागेल. त्यानंतर त्यांनी देशसेवेचा मार्ग पत्करला. परीक्षेनंतर मिळालेल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते भारतात परतले.

१६ जुलै १९२१ ला भारतात परतल्यानंतर ते मुंबईत महात्मा गांधी यांना भेटले. तेथे त्यांच्यात एक तास चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी गांधीजींना विचारले होते, असहकाराचा अर्थ मला समजतोय. पण ही अहिंसा म्हणजे काय? अहिंसेचा मार्ग त्यांना कधीच मान्य नव्हता. त्यामुळेच त्यांचे कायम गांधीजींशी मतभेद राहिले. पुढे २५ डिसेंबर १९२१ मध्ये प्रिंस ऑफ वेल्स कोलकता येथे आले. त्यावेळी संपूर्ण देशात त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. कोलकत्यात झालेल्या निदर्शनात भाग घेऊन सुभाषचंद्र यांना सहा महिन्याची शिक्षा झाली. त्यानंतर दासबाबू यांनी स्वराज दल स्थापन केले. सुभाषचंद्र या दलाचे प्रमुख होते. या दलाचे मुखपत्र फॉ़रवर्डचे ते संपादकही होते. 

आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनात ते गांधीजींबरोबर होते.पण गांधीजींच्या कायदेभंगाला त्यांचा जरी पाठींबा होता तरीही अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता.त्यांच्या मते ‘इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही.स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते.त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!’पण गांधीजींबद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता.

गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी दिली. गांधीजींना काँग्रेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशांविरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला.काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की ‘तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?’तर सुभाषबाबु म्हणाले की ‘मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावल तर २० कोटी लोक सहभागी होतील्.

netaji subhash chandra bose
netaji subhash chandra bose

गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती ते एकदा म्हणाले होते की गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही. गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते. फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या.

त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला. आपल्या सैन्याला आपल्यावर पुर्ण विश्वास असावा यासाठी ते काळजी घेत. सिंगापुरमध्ये जुलै १९४३ साली दिलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले की “मी हिंदुस्तानाशीच एकनिष्ठ राहिल. मी माझ्या मातृभुमिशी कधीच गद्दारी करणार नाही. मी मातृभुमिसाठीच जगेल तिच्यासाठीच मरेल. मला शिक्षा आणि शारीरीक त्रास देउनही ब्रिटीश मला थांबवु शकले नाहीत.ब्रिटीश मला फितवुही शकत नाहीत आणि मला फसवुही शकत नाहीत.

१९३३ ते १९३६ या काळात ते युरोप मध्ये होते. ऑस्ट्रीयात व्हिएन्नाला राहिले. हिटलर, मुसोलिनी, इमोन डी, व्ह्यलेरांना भेटले. युरोपच्या राजकारणाचा अभ्यास केला १९३८ च्या हरिपुरा कॉग्रेसं चे अध्यक्ष निवडले गेले. १९३९ साली हि त्यांनाच अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. गांधीजींना ते मान्य नव्हते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला. फ़ौरवर्डब्लाकची लढाऊ आघाडी उघडली. सुभाषचंद्र यांचे व्यक्तिमत्व लढाऊ व वादळी होते.

त्यांमुळे ब्रिटीश सरकारने त्यांची धास्तीच घेतलेली होती. त्यासाठी त्यांना ते नेहमीच तुरुंगात पाठवीत. सुभाषबाबूंच्या मनातील मार्ग ब्रिटिशांनी ओळखून त्यांना १९२४ मध्ये नजरकैदेत ठेवले. त्यांच्यावर ते क्रांतीकारक असल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यावेळी दासबाबूंनी सुभाषचंद्र यांना सोडून द्यावे किंवा त्यांच्यावर खटला तरी चालवावा अशी मागणी केली. पण सरकारने त्यांना ब्रह्मदेश येथील मंडालेच्या तुरूंगात पाठवले.

संपूर्ण देशात याविरूद्ध संतापाची लाट पसरली. पुढे नंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण तेथून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. पुढे १९४१ साली सुभाषचंद्र यांना वेषांतर केले. आणि  “झियाउद्दीन” असे नाव धारण करून ते ब्रिटीश्यांच्या नजर कैदेतून सुटले. त्यांच्या भव्य व बलदंड शरीरावरून ते पठाण वाटत. ते भारत सोडून गेले. ब्रीटीश्यांचे जे जे शत्रू हते त्यांना त्यांना ते भेटले. जर्मनीत हिटलरला, जपान मध्ये टोजोला. त्यांनी भारतातले नौजवान एकत्रित केले. आणि ‘आझाद हिंद सेना’ स्थापन केली. ब्रिटीश्याबरोबर युद्ध करून भारत स्वाभिमानाने स्वतंत्र करायचा असा सुभाष बाबूंचा निश्चय होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता. त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य विचारांचाही अभ्यास केला होता. त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती. ज्यास त्यांनी ‘साम्यवाद’ हे नाव दिले होते. व्यक्तिपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे, निस्सीम राष्ट्रवाद अत्यावश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.

जरीही फॅसिझमला काही अंशी त्यांचा पाठींबा होता तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवादास त्यांचा विरोध होता. जर्मनीमध्ये त्यांनी ‘जय हिंद’ हा नारा दिला तसेच ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत बनवले आणि हिंदुस्तानीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. सुभाषबाबुंना ‘नेताजी’ ही उपाधी देण्यात आली.जर्मन सरकारच्या मदतीने ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली व लष्करी शिक्षण भारतीयांना दिले गेले.

सुभाषबाबुंनी स्वतः असे लष्करी शिक्षण घेतले.मार्च १९४२ मध्ये जेंव्हा नेताजी हिटलरला भेटले तेंव्हा त्यांनी भारतातही ब्रिटीशांविरुध्द क्रांतिकारक हल्ला करतील व बाहेरुन जर्मन सैन्य व आझाद हिंद सेना हल्ला करेल असे त्यांनी हिटलरला सुचवले. हिटलरने म्हटले की सशस्त्र असे काही हजारांचे सैन्यही काही लाख निशस्त्र क्रांतिकारकाविरुध्द यशस्वीपणे लढा देउ शकते. नंतर जर्मनीमध्ये हिटलरच्या उपस्थितीत आझाद हिंद सेनेतील सैनिकांना शपथ दिली गेली.

त्यामध्ये हिटलरने म्हटले की “तुम्ही आणि तुमचे नेताजी ज्याप्रमाणे स्वतःच्या देशाला परकीय सत्तेला हाकलुन देण्यासाठी ज्या जिद्दीनी प्रयत्न करता आहात त्यावर मी खुष झालो आहे. तुमच्या नेताजींचे स्थान माझ्यापेक्षाही मोठे आहे. जिथे मी ८कोटी जर्मनांचा नेता आहे तिथे तुमचे नेताजी ४०कोटी भारतीयांचे नेते आहेत.सर्व बाजुंनी ते माझ्यापेक्षा मोठे नेते आणि सेनापती आहेत.मी त्यांना सॅल्युट करतो आणि जर्मनी त्यांना सॅल्युट करते.

सर्व भारतीयांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी सुभाषबाबुंना त्यांचा führer म्हणुन मान्यता द्यावी. मला यात बिल्कुल शंका नाही की सर्व भारतीयांनी हे केले तर लवकरच भारत स्वतंत्र होईल”. जर्मनीचा रशियाने चांगलाच प्रतिकार केल्याने सुभाषबाबुंनी जपानला जाउन त्यांची मदत घ्यायचे ठरवले आणि १३ फेब्रुवारी १९४३ साली ते पाणबुडीने जपानला गेले.

जपानमध्ये रासबिहारी बोस या क्रांतिकारकाने आधीच जपानी सरकारच्या मदतीने भारतीयांचे सैन्य उभे केले होते. नेताजी तिथे पोहोचल्यावर त्या सैन्याचे प्रमुख नेताजींना बनवण्यात आले. जपानच्या पंतप्रधान टोजोला नेताजी भेटले. टोजोने भारतीय स्वातंत्र्यचळवळिला पाठींबा दिला. जपान, सिंगापुर, बर्मा, शहिद्-स्वराज् (अंदमान्-निकोबार्), इंफाळ येथील नेताजींची भाषणे खुप गाजली. जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांचे भरभरुन स्वागत झाले. ५ जुलै १९४३ साली आझाद हिंद सेनेचे त्यांनी नेतृत्व स्विकारले.

त्यावेळी त्यात १३००० सैनिक होते. नेताजी म्हणाले की ”आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा दिवस आहे. एक वेळ अशी होती की लोक म्हणत होते की ब्रिटीश साम्राज्यात सुर्य कधीच मावळणार नाही. पण मी असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही.

या युध्दात कोण जिवंत राहील आणि कोण धारातीर्थी पडेल मला माहीत नाही. पण मला हे नक्कीच माहीत आहे की आपण शेवटी जिंकुच. पण आपले युध्द तेंव्हाच संपेल जेंव्हा ब्रिटिश साम्राज्याच्या दुसर्‍या थडग्यावर म्हणजे दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर आपण परेड करु. हे सैनिकांनो त्यामुळे आपला एकच नारा असला पाहीजे- ‘चलो दिल्ली,चलो दिल्ली’.

मी नेहमीच असा विचार केला की स्वातंत्र्य मिळवण्यास भारताकडे सर्व गोष्टी आहेत. पण एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सैन्याची. तुम्ही भाग्यवान आहात की भारताच्या पहिल्या सैन्याचे तुम्ही भाग आहात्.”नेताजींना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. लोक स्वतःचे सर्वस्व त्यांना अर्पण करत होते.

कधीही बॉम्बहल्ला झाला की ते म्हणत ‘माझा जीव घेईल असा बॉम्ब अजुन निर्माण झालेला नाही आहे. आझाद हिंद सेनेच्या उदाहरणाने ब्रिटीश इंडीयन सैन्य आपल्या ऐकण्यात राहीलेले नाही हे ब्रिटीशांना कळल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे साहजिकच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सर्वात महत्वाचे योगदान दिल्याचे श्रेय द्यावेच.

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *