Nighoj Potholes
- इन्फोमराठी, भटकंती

आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड निघोज

अहमदनगर ला निसर्गाने खूप भर भरून दिलंय ह्याचाच एक उदाहरण निगोज चे रांजणखळगे अहमदनगरहून पुण्याकडे जाताना शिरूरच्या अलिकडेच उजवीकडे एक फ़ाटा जातो. अंदाजे ६५ कि.मि. आत गेल्यावर निघोज गाव लागते. आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही.

अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते. या गावात “श्री मळगंगा माउली”चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे रांजणखळगे गावापासून तीन कि.मी अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात आहे.

Nighoj Potholes
छायाचित्र – राजेंद्र बुलबुले

खळखळणार पाणी अती सुदंर धबधबे थोडयाशा ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लीत करते. उन्हाळयात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणिवच भासू देत नाही एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. इंग्रजीत पॉट होल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुदंर व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात.

तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो. सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते.मी हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.

नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब होते. भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे.

कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.

या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.

या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वहात जाते. या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात.

या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे. रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.

इथे फ़क्त एकच गोष्ट जाणवली म्हणजे परिसरातला प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा प्रचंड कचरा. पर्यटकांनी जेवण झाल्यावर चक्क रांजण खळग्यातच थर्माकोलच्या पत्रावळ्या अक्षरश: दाबून बसवल्या होत्या. आणि इतरत्रही बराच कचरा होता. इथे पर्यटकांसाठी “परिसरात प्लॅस्टिक/थर्माकोलचा कचरा टाकू नये” अश्यासारख्या पाट्या लावण्याची गरज आहे.

छायाचित्र – राजेंद्र बुलबुले, लेखन – Admin (www.infomarathi.in)

2 thoughts on “आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड निघोज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *