Kasba Ganpati Pune
- इन्फोमराठी

पुण्यातील ग्राम दैवत कसबा गणपती

एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठेपुरते मर्यादित होते. त्यावेळी ते कसबे पुणे या नावाने ओळखले जाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्याचा विस्तार झाला. आदिलशाही मध्ये कसबे पुणे हे दुर्लक्षित गाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली.

१६४२ ला जिजाऊ माँसाहेब या बाल शिवाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्याची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्याचे ठरविले. या कार्यावर लोकांचा विश्वास बसावा आणि या कामासाठी त्यांचे सहकार्य मिळावे यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाऊ माँसाहेबांनी कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवाजीचे महाराजांचे बालपण जिजाऊ माँसाहेबांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले.

कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या कसबा पेठेत असलेल्या देवळातला गणपती. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. हा गणपती एका दगडी गाभार्‍यात असून तांदळा स्वरूपात आहे.

Kasba Ganpati

तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे.

गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिध्द आहे. मंदिराजवळील लाल महालातच शिवरायांचे बालपण गेले.

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे. कसबा ही पुण्याची मुळ वस्ती आहे. शहाजीराजे भोसले यांनी १६३६ साली पुण्यात लाल महाल बांधला. तेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी या गणपतीच्या मुर्तीच्या स्थापनेसाठी मंदिर बांधले. 

छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाताना या मुर्तीचे दर्शन घेऊन जात असे. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला पहिले स्थान असते. पुण्याच्या महापौर यांच्या हस्ते पालखीतल्या या गणपतीची पुजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. जेव्हा १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजिनक गणेशोत्सवाची सुरवात केली त्याच वर्षी कसबा गणपती सार्वजिनक मंडाळाची स्थापना करण्यात आली होती. 

शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणतात. आजही घरात होणार्‍या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे.

पुणेला गणपतीच शहर म्हंटला जात. जुन्या काळी गणपतीचे कार्यक्रम शनिवारवाड्यात होत होते. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणुकीत सगळ्यात पहिला असतो.

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *