Ganesha Pooja 21 Patri
- इन्फोमराठी

गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या २१ पत्रीचं आयुर्वेदिक महत्त्व

आपल्याकडे प्रत्येक सण आणि वारांच्या मागे काही ना काही शास्त्रीय महत्त्व आहे. गणपतीच्या पूजेसाठी लागणा-या या २१ पत्रींचंदेखील आरोग्याच्या किंवा शास्त्राच्या दृष्टीने काही ना काही महत्त्व आहे. त्यात माची, दुर्वा, धतुरा, सिंधुवुरा, जाजी, गंधकी, शमी, अश्वता, अर्जुन, अर्क अशा कितीतरी पत्रींचा समावेश असतो.

Ganesha Pooja 21 Patri

पण यातल्या कित्येक पत्री आपल्याकडे मिळतातच असं नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात आपल्याकडे मिळणा-या काही पत्रींची माहिती करून घेऊया. या वनस्पतींमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. चूर्णाच्या किंवा अखंड पानाच्या स्वरुपात देखील चावून खाल्ल्यास कित्येक विकार दूर होतात. त्यातल्या काही महत्त्वाच्या वनस्पतींचं आयुर्वेदिक महत्व जाणून घेऊयात.

दुर्वा

दुर्वा ही गणपतीची सगळ्यात आवडती वनस्पती सांगितली जाते. त्यामुळे या वनस्पतीला गणपतीच्या पूजनामध्ये खूप महत्त्व आहे. दुर्वा ही अतिशय थंड गुणधर्माची वनस्पती आहे. त्यामुळे ती वात, कफ आणि पित्त या तिन्ही विकारांवर अतिशय गुणकारी ठरते.

बगीच्यामध्ये गवतात या दुर्वा असतात. म्हणून कित्येकदा डॉक्टर डोळ्यांचे विकार असणा-यांना गवतावरून चालायला सांगतात. थंडगार दुर्वावर चालल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पोटाच्या विकारांवरदेखील गुणकारी ठरते. याशिवाय गर्भपात, उदर रोग, अतिसार, रक्त पित्त, प्रदर, गर्भस्रव आदी विकारांवर उपयुक्त ठरते. तसंच कांतिवर्धक म्हणूनही याचा उपयोग होतो असं आयुर्वेदात सांगितलं आहे.

केवडा

एरव्ही गणपतीला दुर्वा आवडत असल्या तरी श्रावण-भाद्रपदात मिळाणारा केवडा देखील गणपतीला वाहिला जातो. केवडा ही वनस्पती अपस्मारावर गुणकारी आहे. काताच्या गोळ्या महिनाभर केवडयाच्या पानात बांधून ठेवायच्या आणि नंतर त्या तोंडात चघळायच्या. त्यामुळे मुखशुद्धी होतेच याशिवाय आंबट ढेकरदेखील येत नाहीत.

बिल्व किंवा बेल

बिल्व अर्थात बेल. खरं म्हणजे शंकराच्या पूजेत या पत्रीला किंवा पानाला महत्त्व आहे. आचार्य चरक आणि सुश्रुत या दोन्ही ग्रंथांत या पानाला खूप महत्त्व आहे. कधी कधी बाजारात दोन प्रकारचे बेल मिळतात, एक लहान आणि दुसरे मोठी पानं असलेले. दोन्ही पानांचे गुण समान आहेत. आतडयाच्या विकारावर बेल अत्यंत गुणकारी समजला जातो. तो आतडयांची कार्यक्षमता वाढवतो, भूक वाढवतो. तसंच बेलामुळे काही इंद्रियांचं कार्य सुधारण्यास मदत होते.

बेलात साखर कमी करणारे घटक असतात. रातांधळेपणा, डोकेदुखी, उवा, क्षय, बहिरेपणा, हृदयविकार, पोटाचे दुखणे, अजीर्ण, आम्लपित्त, मंदाग्नी, रक्तविकार, मधुमेह, जलोदर, ताप, तृषाविकार आणि त्वचाविकार आदी विकारांवर गुणकारी ठरतो. हे जेव्हा वाहतो तेव्हा बोट आणि तळहातावरच्या पृष्ठभागांवरील विषाणूंना मारून हाताला सुगंध पसरतो.

धोत्रा

दम्याच्या विकारांवर अत्यंत गुणकारी समजला जातो. थंड प्रकृती असल्यामुळे त्याचा रस कानात घातल्याने कानदुखी थांबते. धोत्र्याच्या पानाला तेल लावून ते गरम करून लहान मुलांच्या पोटावर बांधल्यास बाळांची सर्दी दूर होण्यास मदत होते. फोडावर बांधल्यास फोड त्वरीत बरा होतो. मूळव्याध किंवा प्रसुतीदरम्यान होणा-या विकारांवरदेखील उपयुक्त ठरतं. याशिवाय सांधेदुखी, त्वचारोग, केसांची गळती या विकारांवरदेखील अतिशय उपयुक्त ठरते.

बदरी

पचनशक्ती सुधारते. याशिवाय मुरगळ येणे किंवा लचकणे, या विकारांवरदेखील गुणकारी ठरते. रक्ताभिसरण सुधारते. तसंच आवाजाची पातळी योग्य ठेवते. मूत्रविकार, सर्दी, दमा या विकारांवर गुणकारी ठरते.

शमी

गणपतीच्या पूजेतलं आणखी एक महत्त्वाचं पान. अंगावर व्रण आल्यास त्यावर शमीच्या पानाचं चूर्ण टाकल्यास व्रण लवकर नाहीसा होतो. उष्णतेच्या विकारावर अतिशय गुणकारी आहे. स्किझोफ्रेनिया सारखे मानसिक आजार दूर होतात. शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर फेकण्याचं काम करते. डायरिया, मूळव्याध, अस्थमा, सांधेदुखी, दीर्घकालीन कफ, त्वचाविकार आदी विकारांवर गुणकारी ठरते.

तुळस

एरव्ही गणपतीला तुळस वाहिली जात नाही, मात्र गणेश चतुर्थीच्या पुजेत हा मान तुळशीच्या पानाला मिळतो. असा काहीसा समज आहे. ही एक औषधी वनस्पती असून हवा शुद्ध करण्याची क्षमता या वनस्पतीत आहे. सर्दी, खोकला, तापावर तुळशीच्या काढयाचा उपयोग होतो. तुळशीच्या पानामधून जंतूनाशक असे सुगंधी द्रव्य बाहेर पडत असते. त्यामुळे डास निर्मूलन व इतर वायूजन्य संसर्गजन्य रोगांपासून अटकाव होतो.

माका

हे हमखास पावसाळ्यात उगवणारं झुडुप आहे. माक्याचे चूर्ण पोटातून घेतल्यास चयापचयाचे कार्य चांगले होते. म्हातारपण लांबगे, माक्याचा रस किंवा तेल केसांना हितकारी आहे. केसांचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी उपयोग होतो. यकृतासाठी अत्यंत गुणकारी आहे.

अगस्ती

अगस्ती किंवा हादगा हा मोठा वृक्ष आहे. या वनस्पतीमध्ये अ जीवनसत्त्व आहे. याच्या पानांचा रस सर्दीवर गुणकारी ठरतो. दृष्टी कमी झाल्यास या वनस्पतीच्या फुलांचा रस डोळ्यात घालतात.

मरवा

मरवा या वनस्पतीच्या पानापासून सुगंधी तेल तयार केले जाते. हे तेल उत्तेजक असते. गवती चहाप्रमाणेच हे तेल ताप आणि पोटदुखी यावर उपयुक्त ठरतं. याचा रस आणि राख जुनाट व्रणावर अतिशय उपयोगी आहे.

रूई

रूईच्या पानाच्या चाटणाने हरतालिका व्रताची सांगता होते. रूईचं पान मंदार नावानेही ओळखलं जातं. श्वेत मांदार, गंध मांदार आणि चंड मांदार असे याचे बरेच प्रकार आहेत. यात भरपूर प्रमाणात क्षार असून त्वचाविकारांवर लाभदायी ठरते. त्वचा अ‍ॅलर्जी किंवा रूक्षपणा यामुळे खाज येते. यापासून सुटका मिळवण्यासाठी रूईचे देठ जाळून त्याची राख तेलात मिसळून ती खाज येणार्‍या जागी लावावी.

शरीराच्या कोणत्याही भागाला इजा झाल्यास रूईचे पान गरम करून बांधावे. त्यामुळे जखमेतून रक्‍त वाहणे बंद होते. तसेच सूज आणि वेदनाही कमी होतात. 

आपल्याकडे प्रत्येक सण आणि वारांच्या मागे काही ना काही शास्त्रीय महत्त्व आहे. गणपतीच्या पूजेसाठी लागणा-या या २१ पत्रींचंदेखील आरोग्याच्या किंवा शास्त्राच्या दृष्टीने काही ना काही महत्त्व आहे. 

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *