गणेशाला दुर्वा अतिप्रिय असल्याचे मानले जाते. त्याबद्दलच्या अनेक कथा विविध पुराणांतर्गत आलेल्या आहेत. अनलासुर नामक राक्षसाने त्रैलोक्यातील सर्व प्राणिमात्रांचा छळ करून त्यांना जगणे मुश्कील केले होते. देवही त्याच्या तावडीतून सुटले नव्हते. अखेर कंटाळून सर्व देव गणपतीला शरण गेले. त्यांची व्यथा-कथा ऐकताच क्षणाचाही विलंब न करता महाकाय गणपतीने अनलासुराला गिळून टाकले.
हा अनलासुर म्हणजे अग्नीचेच एक रूप होते. त्यामुळे त्याला गिळल्यानंतर लगेचच गणपतीच्या सर्वांगाची आग होऊ लागली. त्यामुळे गणपतीला त्रास होऊ लागला. आपल्या संकटाचा परिहार करण्यासाठी गणपतीने अनलासुराला गिळले आणि त्यामुळेच त्याला या शारीरिक पीडा होत आहेत या जाणीवेने सगळे देव अस्वस्थ झाले. त्यांनी आपापल्या परीने गणपतीचा दाह शमावा, त्याला पुन्हा स्वास्थ्य लाभावे म्हणून विविध उपचारांना सुरुवात केली.
वनौषधींचे लेप त्याच्या सर्वांगाला लावले. वरुणाने थंडगार जलवर्षाव केला. स्वत: भगवान शिवशंकरांनी स्वत:च्या गळ्यातील थंडावा देणारा नाग काढून त्याच्या गळ्याभोवती बांधण्यासाठी दिला. इंदाने त्याच्या मस्तकावर चंद ठेवला. ब्रह्मदेवाच्या ऋद्धीसिद्धी या दोन्ही कन्यका गणपतीच्या दोन्ही बाजूंना उभ्या हारून वाळ्याच्या पंख्याने त्याला वारा घालू लागल्या. पण यापैकी कशाचाही अनुकूल परिणाम होईना.
गणपतीच्या या त्रासाची वार्ता सर्वदूर पसरल्याने अनेक ऋषीमुनी तपस्वीदेखील त्या स्थळी आले होते. त्या हजारो ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांच्या जुड्या गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या. या उपचाराने मात्र त्याचा दाह शमला. आपल्या व्यथेला दूर करणारी दुर्वा त्या प्रसंगापासून गणपतीला अतिप्रिय झाली!
पुढे एका प्रसंगी, मिथिला नगरीतील राजा जनक स्वत:लाच ईश्वर मानतो, ते चूक आहे हे त्याला पटवून देणचा मनोदय देवषीर् नारदांनी गणपतीकडे प्रकट केला. त्यानुसार मग गणपतीने वृद्ध माणसाचे रूप घेऊन जनकराजाकडे जाऊन अन्नाची मागणी केली. जनकराजाने त्याला आदरपूर्वक भोजन दिले. जनकाच्या पाकशाळेत शिजवलेले सर्व अन्नपदार्थ संपले तरीही ब्राह्मण दाम्पत्याचे पोट काही भरेना. कोठारातील धान्यही संपले. म्हणून मग तो वृद्ध ब्राह्मण नगरीतील घराघरात अन्नासाठी फिरू लागला.
त्या राज्यात कोणाच्याच घरी अन्न उरले नव्हते. नेमक्या एका घरी मात्र गणपतीला आशादायक चित्र दिसले. ते घर त्रिशिरस आणि विरोचना या गरीब ब्राह्मणाचे होते. त्यांच्या घरात संसाराला आवश्यक असे अन्न, वस्त्र, भांडीकुंडी यापैकी काहीही नव्हते.
उरला होता तो फक्त गणेशपूजेसाठी आणलेल्या दुर्वांपैकी एकुलता एक दुर्वांकुर! तोच त्या ब्राह्मण गाम्पत्याने अतिशय प्रेमपूर्वक गणपतीला दिला. तो खाताच त्या वृद्ध ब्राह्मणाच्या रुपातील गणेशाची भूक शमली. प्रसन्न होऊन गणपतीने त्या दाम्पत्याला आपल्या मूळ रूपाचे दर्शन घडवले.
स्थावर नगरीतील ‘कौण्डिण्य’ हा गणेशभक्त गणपतीला रोज न चुकता दुर्वा वाहत असे. ‘आपला नवरा असे हे भाराभर गवत गणपतीच्या डोक्यावर का घालतो?’ असा प्रश्न त्याच्या आश्रया नामक पत्नीला नेहमी पडे. त्यावेळी दुर्वांचा महिमा तिला कळावा म्हणून कौंडिण्याने तिला एक दुर्वांकुर देऊन इंदाकडून त्या दुवेर्च्या वजनाएवढे सोने घेऊन येण्यास सांगितले.
आश्रया त्याप्रमाणे इंदाकडे गेली. इंदाने तिला कुबेराकडे पाठवले. कुबेराची सारी संपत्ती तराजूत घालूनही दुर्वा असलेले पारडे काही वर जाईना. कुबेराने सरतेशेवटी स्वत:सह आपली नगरीच त्या दुसऱ्या पारड्यात घातली तरीही वजनाचा काटा काही हलेना. हे सारे पाहून आश्रयाला मनोमन दुर्वांची किंमत कळली. या झाल्या पुराणकथा!
प्रत्यक्षातही दुर्वांमधील औषधी गुणांची किंमत आजही आपण करू शकणार नाही. त्यांची खरी किंमत प्रथम गणपतीला आणि नंतर आपल्या धर्मधुरिणांनाही समजली होती. म्हणून तिचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे म्हणून गणपतीने तिला ‘आपली’ म्हटले. परिणामी गणेशपूजेच दुर्वांना मानाचे स्थान मिळाले.
संकलन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in