ganpati atharvashirsha marathi
- इन्फोमराठी

गणपती अथर्वशीर्षाचा मराठी अनुवाद माहिती आहे का ?

असे म्हणतात की श्रीगणेशाने दृष्टांत दिल्यानंतर गणक ऋषींनी अथर्वशीर्ष लिहिले. अथर्वशीर्ष पठणामुळे मन एकाग्र होते. त्यामुळे असे हे कदाचित घडत असेल. आपल्या मनाची ताकद वाढविणे हे आपल्याच हातात असते. माणसाचे मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. शरीराबरोबरच मन कणखर असेल तर मग आपण संकटांवर मात करू शकतो. मन स्थिर असेल तर आपण ते वर्तमानात  ठेवून प्रत्येक काम करू शकतो.

बऱ्याच  लोकांचे मन हे काम करतांना वर्तमान काळात राहत नाही. नेहमी रस्ता नीटपणे ओलांडणारा माणूस जर त्याचे मन वर्तमान काळात नसेल तर रस्ता ओलांडताना समोरहून येणारे वाहन त्याला दिसत नाही आणि अपघात घडतो. नेहमी मन वर्तमान काळात आणि स्थिर असणं आवश्यक असतं . बऱ्याचवेळा  माणसाचे शरीर वर्तमानकाळात असले तरी मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात विहार करीत असते.

मन भूतकाळात असले तर सारख्या दु:खद घटना आठवत राहतात. आणि मन भविष्यकाळात असले तर चिंता भेडसावू लागतात. आपले शरीर असते वर्तमान काळात , पण मनाला भूतकाळातील दु:खाचे आणि भविष्यकाळातील चिंतेचे ओझे सांभाळण्याचा प्रयत्न करावा लागतो. मग माणसाच्या हातून होणारे काम हे नीट होत नाही. म्हणून बुद्धी आणि मन हे स्थिर राहणे गरजेचे असते . हे काम अथर्वशीर्ष पठणाने साध्य होते असे गणेश उपासकांचे मत आहे. 

ganpati atharvashirsha in marathi

भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.

अथर्वशीर्षाची नियमीत आवर्तने करणारे आपल्यात अनेक असतील. बर्‍याचदा असे होते की धार्मिक विधी अथवा परंपरा पाळत असताना आपल्याला त्याचा अर्थ ठाऊक नसतो, फलश्रुति ठाऊक नसते. ह्यासाठीच यंदाच्या गणेशोत्सवात खास मायबोलीकरांसाठी संपूर्ण अथर्वशीर्षाचा मराठीत अनुवाद केला आहे. तर समजावून घेऊयात अथर्वशीर्षाचा अर्थ आणि उद्देश.

अथर्वशीर्षाचा अर्थ 

मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे. आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहूया. अथर्वशीर्ष हे उपनिषद असल्याने प्रथम शांतिमंत्र म्हणण्याची पद्धत आहे. ‘ओं भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा’ म्हणजे आम्ही आमच्या कानांनी चांगलंच ऐकावं, आमच्या डोळ्यांनी चांगलंच पाहावं. बलवान, निरोगी शरीराने देवांची सेवा करत मिळालेलं पूर्ण आयुष्य व्यतीत करावं. अथर्वशीर्षांच्या या शांतिमंत्रातूनही आपल्या सकारात्मक संस्कृतीचं दर्शन घडतं.

जगात चांगलं-वाईट दोन्ही आहे, पण मी कशाचा स्वीकार करायचा हे मीच ठरवायला हवं. जे चांगलं आहे तेच मी पाहीन, तेच मी ऐकेन आणि आयुष्याचा कंटाळा न करता, जे मिळालंय आयुष्य ते सार्थ करत जगेन. आपण शुभेच्छा देताना अनेकदा ‘जीवेत  शरद: शतं’ असं म्हणतो. पण ती एवढीच ओळ नाहीये तर ‘जीवेम शरद: शतं अदीना: स्याम’ म्हणजे कुठलंही दैन्य न स्वीकारता आम्ही सगळे शंभर वर्ष जगू, असं सकारात्मक जगणं सांगणारे हे शांतिमंत्र आहेत.

उपनिषद म्हणण्यापूर्वी अशा सकारात्मक लहरी या शान्तिमंत्राच्या माध्यमातून आपल्याभोवती पसरतात. शान्तिमंत्रानंतर मग स्वस्तिमंत्र येतो. ‘ओं स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा:’ म्हणजे इंद्र, सूर्य, बृहस्पती आमचं कायम रक्षण करोत अशी इच्छा व्यक्त केली जाते आणि मग अथर्वशीर्ष सुरू होतं.

‘हे  देवहो, आम्हाला  कानांनी  शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी चांगले पाहावयास मिळो. सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी देवाने ( निसर्गाने ) दिलेले आयुष्य देवाच्या ( निसर्गाच्या ) स्तवनात व्यतीत होवो. सर्वश्रेष्ठ इंद्र आमचे रक्षण करतो. ज्ञानवान सूर्य आमचे कल्याण करतो. संकटांचा नाश करणारा गरूड आमचे कल्याण करतो. बृहस्पती आमचे कल्याण करतो. सर्वत्र शांती नांदो. ॐकाररूपी गणेशाला नमस्कार असो. तूच  ब्रह्मतत्त्व आहेस. तूच सकलांचा कर्ता ( निर्माता ) आहेस.तूच सृष्टीचे धारण करणारा ( पोषण करणारा ) आहेस.

तूच ( सृष्टीचा) संहार करणाराही  आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखर तूच आहेस. तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस. मी योग्य ( तेच) बोलतो, मी खरे ( तेच) बोलतो. तू माझे रक्षण कर. तुझ्याबद्दल बोलणार्या माझे तू रक्षण कर. तुझे नाव श्रवण करणार्या माझे तू रक्षण कर. ( दान ) देणार्या ( अशा) माझे तू रक्षण कर. उत्पादक ( अशा ) माझे तू रक्षण कर. ( तुझी) उपासना करणार्या शिष्याचे रक्षण कर.    

माझे पश्चिमेकडून रक्षण कर. माझे पूर्वेकडून रक्षण कर. माझे उत्तरेकडून रक्षण कर. माझे दक्षिणेकडून रक्षण कर. माझे वरून रक्षण कर. माझे खालून रक्षण कर. सर्व बाजूनीं, सर्वप्रकारे तू माझे रक्षण कर. तू वेदादी वाड्.मय आहेस. तू चैतन्यस्वरूप आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू सत् , चित् , आनंदस्वरूप ! अद्वितीय आहेस. तू साक्षात ब्रह्म आहेस. तू ज्ञानविज्ञानमय आहेस. हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होते.

हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीनेच स्थिर राहते. हे सर्व जग तुझ्यातच लय पावते. हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होते. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस. तसेच    ( परा,पश्यन्ती , मध्यमा आणि वैखरी या ) चार वाणी तूच आहेस. तू ( सत्त्व, रज आणि तम या ) तीन गुणांपलीकडचा आहेस. तू  ( स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या ) तीन देहांपलीकडचा आहेस. तू ( भूत, वर्तमान आणि भविष्य या ) तीनही काळांच्या पलीकडचा आहेस. तू सृष्टीचा मूल आधार म्हणून स्थिर आहेस.

तू ( उत्पत्ती , स्थिती आणि लय या ) तीनही शक्तींच्या पलीकडचा आहेस. योगी लोक नेहमी तुझे ध्यान करतात. तूच ब्रह्मा,तूच विष्णू,तूच रुद्र, तूच इंद्र,तूच भूलोक,तूच भुवर्लोक,तूच स्वर्लोक आणि ॐ ( हे सर्व ) तूच आहेस. गण शब्दातील आदि ‘ ग् ‘ प्रथम उच्चारून नंतर ‘अ ‘चा उच्चार करावा. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा. तो तारक मंत्राने ( ॐ काराने ) युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र ‘ॐगॅं ‘ असा होतो. हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे. ‘ग्’ हे मंत्राचे पूर्व रूप आहे. ‘ अ’ हा मंत्राचा मध्य आहे. अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे. अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे. या ( गकारादी ) चारांपासून एक नाद तयार होतो. हा नादही एकरूप होतो. ती ही गणेशविद्या होय. 

या मंत्राचे ऋषी ‘ गणक ‘ हे होत.  ‘निचृद् गायत्री ‘ हा या मंत्राचा छंद होय. गणपती ही देवता आहे. ‘ॐ गॅं ‘ ह्या मंत्ररूपाने दर्शविल्या जाणार्या गणेशाला माझा नमस्कार असो. आम्ही त्या एकदंताला जाणतो. त्या वक्रतुण्डाचे ध्यान करतो. म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती देवो. ज्याला एक दात असून पाश, अंकुश व दात धारण केलेले तीन हात, आणि वर देण्यासाठी चौथा हात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन आहे.

ज्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठे आहे, कान सुपासारखे आहेत, ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत, अंगोला लाल चंदन लावले आहे, ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे, भक्तांविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेला, अशा गणेशाचे जो ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय. व्रतधारिणांच्या प्रमुखांना ( व्रातपतीस ) नमस्कार असो. देवसमुदायांच्या अधिपतीला नमस्कार असो, शंकरगणसमुदायाच्या अधिपतीला ( प्रमथपति ) नमस्कार असो. लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी, शिवपुत्र, वरदमूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार असो. 

असा चराचरात भरलेला गणपती कुठे-कुठे प्रत्ययाला येतो? तर केलं जाणारं काम आणि उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द यात गणपतीच आहे. कारण तो वाङ्मयस्वरूप आहे. तो चिन्मय आहे. तो चतन्य आहे. जीवनशक्ती आणि आनंदशक्ती म्हणजे तोच आहे. तो आनंद आहे, तो चतन्य आहे, थोडक्यात तोच सच्चिदानंद आहे.

तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. तो अनुभूतीतूनच उमगतो, तो पंच तत्त्व, पंचमहाभूत आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणी म्हणजेही तोच आहे. थोडक्यात माझ्या आतलं आणि माझ्या भवतीचं सगळं विश्व म्हणजे गणपती आहे. त्याच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन हे, ब्रह्माचं जे वर्णन केलं जातं त्याच पद्धतीने यात केलं आहे.

संकलन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *