sarvajanik ganesh utsav
- इन्फोमराठी

सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा कशी मिळाली??

देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. हा गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्रेरणा कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे. तसेच गणपतीला सार्वजनिक गणेशाचे जे रूप मिळाले, त्याला ग्वाल्हेरचा गणपतीही कारणीभूत आहे.

१८९१ च्या सुमारास पुण्याचे वैद्य खाजगीवाले ग्वाल्हेर येथे गेले होते. तेव्हा तेथे सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गणेशपूजेमुळे ते प्रभावित झाले. त्यांना वाटले, हा उपक्रम पुण्यात चालू करावा आणि त्यासाठी लोकमान्यांची मान्यता मिळवावी. एकोणिसाव्या शतकातील शेवटची १५ – २० वर्षे पुण्यात टिळक वर्षेच मानली गेली होती. प्रत्येक गोष्टीवर लोकमान्य कसा विचार करतील, असा विचार करण्याची तरुणांच्यात एक प्रवृत्तीच निर्माण झाली होती.

वैद्य खासगीवाले यांनी गणेशोत्सवाची ही कल्पना त्यांचे समवयस्क मित्र दगडू हलवाई, भाऊ रंगारी आदींना सांगितली. हा विषय आपण टिळकांना सांगू, अशी कल्पना पुढे आली; पण आधी केले मग सांगितले या विषयावर लोकमान्यांचे नुकतेच भाषण झाले होते. त्यामुळे या मंडळींनी प्रथम सार्वजनिक गणपति बसवला, काही कार्यक्रम ठरवले आणि नंतर ते लोकमान्यांना भेटायला गेले.

लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना अतिशय आवडली. त्या वेळी त्यांनी सांगितले, विसर्जनाच्या मिरवणुकीला आपण स्वतः येऊ. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लोकमान्य आल्याची बातमी आजूबाजूला वार्‍यासरशी पसरली आणि पुढे प्रचंड गर्दीही झाली.

ज्या वाडय़ात टिळक रहात होते त्या विंचुरकर वाडय़ात लोकमान्यांनी १८९४ साली गणेशोत्सवाची सुरुवात केली. टिळक येथे लॉ क्लासेस घ्यायचे, त्यामुळे सुरुवातीला हा ‘लॉ क्लासचा गणपती’ म्हणून ओळखला जायचा. लोकमान्य विंचुरकर वाडा सोडून १९०५ साली गायकवाड वाडय़ात राहायला आले, तसे हा उत्सवदेखील त्यांच्याबरोबर गायकवाड वाडय़ात आला. लोकमान्यांचे वास्तव्य याच वाडय़ात अनेक वर्षे होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार हा उत्सव सांभाळण्याची जबाबदारी ‘केसरी’ संस्थेकडे देण्यात आली.

lokmanya tilak infomarathi

स्वत:च्या राहत्या ठिकाणी टिळकांनी सार्वजनिक गणपतीला दिलेले हे स्वरूप अनेकांना प्रेरणा देणारे ठरले. पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होणे हीच जरी ऐतिहासिक घटना असली तरी, पुण्यातील काही मंडळांना, उत्सवांना तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांमुळे वेगळे स्थान लाभले आहे. खुद्द लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेमुळे विंचुरकर वाडय़ात सुरू झालेल्या लोकमान्य टिळक प्रस्थापित सार्वजनिक गणपती ट्रस्ट, विंचुरकर वाडा या गणेशोत्सव मंडळाबाबतही तसेच म्हणता येईल. 

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शताब्दीच्या आधी दोन वर्षे बाळासाहेब भारदे, प्रभाकर कुंटे आणि रवींद्र पाठारे यांनी टिळक प्रस्थापित प्रथम सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन करून उत्सव पुन: सुरू केला. ‘टिळक प्रस्थापित प्रथम गणपती ट्रस्ट’च्या माध्यमातून दरवर्षी गणशोत्सव साधेपणाने मात्र उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाऊ लागला. या गणेशाची विसर्जन मिरवणूक ही पालखीतूनच काढली जाते. 

या प्रथम प्रस्थापित गणपतीपुढे स्वत: लोकमान्य एखादे तरी व्याख्यान देतच पण त्याबरोबरच मान्यवर व्याख्यात्यांनीदेखील या उत्सवात आपले विचार मांडले आहेत. विंचुरकर वाडय़ातील गणेशोत्सवाला अशी बौद्धिक परंपरा, इतिहास आहे. लोकमान्यांची अशी परंपरा लाभल्यामुळे हा गणेशोत्सव आज वेगळा ठरला आहे. 

आता विंचुरकर वाडय़ाचे नूतनीकरण सुरू असून ते पूर्ण झाल्यावर त्यामध्ये या गणपतीस विशेष जागा मिळणार आहे, असे या गणेशोत्सवाचे विश्वस्त रवींद्र पाठारे यांनी सांगितले. लोकमान्यांना अभिप्रेत असेच उपक्रम या मंडळातर्फे उपक्रम घेतले जातात. इतर मोठमोठय़ा मंडळांप्रमाणे उत्सव येथे होत नाही, कसलाही झगमगाट इथे नसतो. किंबहुना येथील उत्सवामागे टिपिकल मंडळाची भूमिका नसून इतिहास आणि जी भावना लोकमान्य टिळकांनी ची होती ती भावना जपण्याचा प्रयत्न अधिक आहे.

लेखन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *