gauri pooja
- इन्फोमराठी

महाराष्ट्र कसा साजरा होतो गौरी पूजन सोहळा?

महाराष्ट्रातील विविध प्रांतांमध्ये आणि काही अन्य राज्यांमध्ये भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षात गौरींचे पूजन करण्यात येते. त्यांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असे म्हणतात. कोकणात तो ‘गौरी-गणपती’ या जोड नावानेच हा सण साजरा करण्यात येतो. तर पश्चिम महाराष्ट्रात त्याला ‘गौरी सण’ असे संबोधतात.

खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात याला महालक्ष्मीचा सण असे म्हटले जाते. प्रत्येक प्रांतात आरास व उत्सवाची प्रथादेखील थोडी निराळी आहे. परंतु भक्तिभाव आणि उत्साह मात्र सारखाच असतो, असे हा सण साजरा करणाऱ्या महिलांनी सांगितले.

gauri poojan

श्रीगणेशोत्सवात कुळाच्या परंपरेनुसार गौरी तथा महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात येते. याच परंपरेची नाळ भोंडला, हादगा आणि भुलाबाई या थोड्यानंतरच्या कालावधीत येणाºया सणांशी जोडलेली आहे. तद्वतच उन्हाळ्यात आखाजीला होणारा गौराई सण बागलाण व खान्देशात गौरी सणाशी साधर्म्य सांगणारा आहे, असे मत अभ्यासक व्यक्त करतात. कुलपरंपरेनुसार कोणी धातूूची, कोणी मातीची प्रतिमा बनवन पूजा करतात. तर काही ठिकाणी कागदावर देवीचे चित्र काढून पूजा करण्याची पद्धत आहे.

काही कुटुंबात नदीकाठावरील पाच लहान खडे आणून त्यांची स्थापना करून गौरी म्हणून पूजा करतात. कोकणात या सणाला मुली माहेरी जातात. तर विदर्भ-मराठवाड्यात मात्र हा सण सासुरवाशिणींचा मानला जातो. गौरी गणपती घरी येणे म्हणजे एकप्रकारे सुख-समृद्धी येणे असे मानले जाते. गौरी आगमनापूर्वी आदल्या दिवशी घराची साफसफाई करण्यात येते.

कोळी समाज बांधवांचा गौराई सणकोकणातील कोळी समाजबांधव याला गौरी मातेचा (आईचा) सण मानतात. म्हणून तिला ‘गौराई इलो’ म्हणजे गौरी माता आली असे म्हटले जाते. या समाजात गौरी बसविण्याची प्रथा थोडी निराळी आहे. भाद्रपद समाप्तीच्या दिवशी सायंकाळी महिला तेरड्याच्या झाडाची एक फांदी गौरीच्या रूपाने वाजत-गाजत घरी आणतात. काही ठिकाणी मातीच्या मूर्तीही आणण्याची प्रथा आहे.

उंबरठ्यावर स्वागत करून घरात गौरीची स्थापना करण्यात येते. दुसºया दिवशी नटवून- सजवून दुपारी मत्स्याहारी नैवेद्य दाखविला जातो. काही घरात शाकाहारी नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. सायंकाळी गौरीच्या समोर स्त्रिया एकाच रंगाच्या साड्या नेसून फेर धरत पारंपरिक पद्धतीची गाणी म्हणत नृत्य करतात. अष्टमीला गौरीचे महापूजन होते. नवमीच्या दिवशी सायंकाळी पारंपरिक वेशभूषेत गौरी-शंकराची मिरवणूक काढून समुद्रात विसर्जन करण्यात येते. 

नैवेद्याचे नानाप्रकार

गौरी पूजन उत्सवात दुसऱ्या दिवशी गौरीला नानाविध फळे व पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. कुलपरंपरेनुसार व रीतीरिवाजानुसार यात फरक दिसून येतो. गौरीच्या नैवेद्यासाठी बनविण्यात येणारे विविध प्रकारचे लाडू, करंज्या, पुऱ्या, सांजोऱ्या, बर्फी आदी तयार करण्यासाठी गृहिणींची आठवडाभरापासून लगबग सुरू असते.

त्याचबरोबर नैवेद्याला पुरणपोळी, खीर आणि सोळा भाज्या, कढी असा बेत असतो. कोकणात नारळाच्या करंजीला महत्त्वाचे स्थान असते. कोकणस्थामध्ये गौरी घावण घाटलं जेवते. तर काही ठिकाणी दही-दुधाचा नैवेद्य दाखवितात. काही मालवणी घरात चक्क वडा-सागुतीचा बेत असतो.

दक्षिण महाराष्ट्रातील भिन्न पद्धती

दक्षिण महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर, सातारा भागात गौरी बसविण्याची प्रथा भिन्न आहे. याठिकाणी गौरी आणण्यासाठी नदी, विहीर किंवा तलावावर जाऊन तेरड्याच्या झुडपाची जुडी एकत्र करून तिची गौरी म्हणून पूजा करतात. त्यानंतर वाजत-गाजत घरी आणून तिची स्थापना करण्यात येते. तिला शेपूची भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो.

दुसऱ्या दिवशी नदीवर शंकराची पूजा करून वाजत-गाजत घरी आणून भक्तिभावाने पूजन करण्यात येते. अष्टमीला गौरी-शंकराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. नवमीला सकाळी गौरीचे नदीवर विसर्जन करून पाच खडे घरात आणूून धान्यात टाकतात. धनधान्य समृद्धी व्हावी, अशी त्यामागची भावना आहे.

कोकणातील गौरी उत्सव

कोकणातील मुख्य सणांपैकी एक म्हणजे गौरी-गणपतीचा उत्सव होय. याठिकाणी फक्त गणेशोत्सव असे कधीच म्हटले जात नाही. तर ‘गौरी-गणपतीचा सण’ असेच म्हटले जाते. यावरून गौरीचे महत्त्व लक्षात येते. आगरी कोकणी वाड्या-पाड्यांमधून या उत्सवानिमित्त आनंदाला उधाण येते. गौराईसमोर पारंपरिक गाणी फेर धरून म्हटली जातात. याच काळात नोकरीनिमित्त मुंबई आणि अन्य प्रांतांमध्ये गेलेले चाकरमाने कोकणात येतात.

गौरी पूजनाला मातीच्या मुखवट्याला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजावट केली जाते. दुसऱ्या दिवशी गौराईला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखविला जातो. तिसऱ्या दिवशी शेतात जाऊन कन्या व भगिनींच्या हस्ते गौरीचे अबीर गुलालाची उधळण करीत विसर्जन केले जाते. बंधू आणि वडिलांना खूप अन्नधान्य मिळावे. सुख-समृद्धी यावी, ही त्यामागची भावना असते.

बहुजन समाजातील प्रथा

गौरी पूजनाची बहुजन समाजातील आणखी एक निराळी प्रथा म्हणजे मातीची नवीन पाच लहान मडकी आणून त्यांची पूजा करण्यात येते. या मडक्यांमध्ये हळदीने रंगविलेला दोरा, पाच खोबऱ्याच्या वाट्या व खारका घालून त्यांची उतरंड रचण्यात येऊन त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसविण्यात येतो. गौरीच्या अशा दोन प्रतिमा तयार करून त्याची पूजा करतात. तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात. तर काही ठिकाणी कुमारिका फुले येणारी रोपटी घरात आणून त्याची पूजा करतात.

संकलन – विजयश श्रीकांत भोसले, www.infomarathi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *