pmjanarogyayojna
- माहिती, इन्फोमराठी

५ लाख खर्च येणाऱ्या कर्करोगाच्या उपचारासाठी सीताबाईंना एकही रुपया मोजावा लागला नाही, वाचा कसं

जुनी जाणती मंडळी नेहमी म्हणत असतात, “माणसाला कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढायची वेळ कधीच येऊ नये, नाहीतर आयुष्य फार अवघड बनून जातं”. खरंच कोर्ट आणि दवाखाना माणसाची मती गुंग करून टाकतो. दोन्ही ठिकाणी प्रचंड पैसा खर्च होतो. शारीरिक व मानसिक त्रासही होतो. पण स्वखुशीने कुणी दवाखान्याची पायरी चढेल का ? अर्थातच ती माणसाची मजबुरी असते.

श्रीमंत व्यक्ती उपचारासाठी महागडे दवाखाने गाठतात, परदेशी जाऊन उपचार घेतात. पण गरिबाने कुठं जायचं, काय करायचं ? अगदी अलीकडे आपण वर्तमान पत्रांमध्ये वाचले असेल कि अमुक एका बॉलिवूड कलाकाराला कॅन्सर झाला आणि उपचारासाठी तो परदेशात गेला आणि ठणठणीत होऊन परतला.

पण सामान्य माणसाला थोडीच हे शक्य असतं. कॅन्सरसारख्या आजाराचे निदान झाल्यावर एखादा माणूस ‘आपल्याला आता उपचारासाठी बराच खर्च येणार तो कुठून आणायचा’, ह्या विचारानेच जास्त चिंतीत असतो. पण, आता अशी चिंता करायचे कारणच उरले नाही.

एखादा श्रीमंत रुग्ण जे उपचार करवून घेऊ शकतो तेच उपचार एखादा सामान्य व गरीब रुग्णही अगदी सहज करवून घेऊ शकतो व तेही अगदी मोफत. तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही सीताबाई सोनू थालके ह्या ६७ वर्षांच्या आजीला एकदा जाऊन भेटाच. म्हणजे तुम्हाला पटेल कि आम्ही जे सांगतोय ते अगदी खरं आहे.

सीताबाई सोनू थालके, वय वर्ष ६७. ह्या सीताबाईंना एक मुलगा त्यांचे नाव भगवान थालके. भगवान थालके ह्यांची मुक्काम पोस्ट कुंडे इथं ४० गुंठे शेती आहे. ४० गुंठे शेतीमध्ये आपल्या प्रपंचाचा गाडा कसाबसा हाकणाऱ्या भगवान थालके ह्यांना एका बातमीने जबर धक्काच बसला.

बातमी होती आपल्या आईला कर्करोगाचे निदान झाल्याची. या बातमीने थालके ह्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. छातीपाशी थोडासा त्रास होत आहे म्हणून त्यांना एका स्थानिक डॉक्टरकडे दाखवले असता त्या डॉक्टरने त्यांना भिवंडीला मोठ्या दवाखान्यात दाखवायचा सल्ला दिला.

भिवंडीच्या महागड्या हॉस्पिटलमध्ये दाखवून सर्व तपासणी केल्यानंतर असे निदान झाले कि सीताबाई सोनू थालके ह्यांना स्तनाचा कर्करोग झाला आहे. हे ऐकून थालके कटुंबीय हादरून गेले. त्यात आजूबाजूचे लोकही चुकीची माहिती सांगून घाबरवून देतात. कुणी म्हणत असे कि आता ह्या आजारावर उपचार करायचे तर तुम्ही ५ लाख रुपयांची तयारी करा. कुणी म्हणत असे कि ५ लाखाने काय होणार तुम्हाला १० लाख रुपये लागतील. हे ऐकून भगवान थालके ह्यांची मतीच गुंग होत असे.

भिवंडीच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी थालके ह्यांना आपल्या आईला कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार भगवान थालके आपल्या आईला कळव्याच्या रुग्णालयात घेऊन आले. आईच्या आजाराचे निदान झाल्यापासून भगवान भालके पैशाची तजवीज कशी करावी या विचारात होते.

वेळ पडलीच तर आपली जमीन विकून पैसे उभे करायचे असा विचार थालके करत होते. पण छत्रपती शिवाजी रुग्णालयात भेटलेल्या आरोग्यमित्राने सगळा प्रश्न एका झटक्यात सोडवला. ह्या आरोग्यमित्राने सरकारच्या एका योजनेविषयी माहिती सांगितली, ज्यामुळे भगवान थालके ह्यांची चिंताच मिटून गेली. त्या योजनेचं नाव आहे ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ जी पूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून ओळखली जात असे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मदत मिळवण्यासाठी थालके यांनी अर्ज केला आणि सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पुढील उपचारांसाठी सीताबाईंना मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. केशरी शिधापत्रिका असल्यामुळे तिथे सोनूबाईंची नोंदणीही लवकर झाली व पुढील उपचार करण्यात आले. कॅन्सरवर उपचारासाठी डॉक्टरांनी केमोथेरपी करण्याचे ठरले.

pm ayushman yojna marathi
Source: Trendmap

२१ दिवसांतून १ वेळा असे ८ केमोथेरपी उपचार सीताबाईंवर करावे लागणार होते. सामान्यतः ह्या सर्व उपचारांसाठी ५ लाखांच्याही पुढे खर्च गेला असता, पण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एकही पैसा खर्च करावा लागला नाही. सीताबाईंवर सर्व उपचार विनामूल्य पार पडत आहेत आणि तेही अगदी वेळेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेने भगवान थालके ह्यांना मोठ्या संकटातून सोडवले.

सुरुवातीला खर्चाची रक्कम ऐकून “एवढे पैसे लागणार असतील तर माझ्यावर उपचार करू नकोस” असे सीताबाईंनी पोराला सांगून टाकले होते. पण आता त्या निर्धास्त झाल्या आहेत. सीताबाई म्हणतात “म्या तर म्हणत होते कुटं औषुध देता, जाऊ द्या. पैसा लई लागल, पण मुलांनी नाय आयकलां. सरकारनं फारच मोटी सोय केली भाऊ, नायतर इतका खर्च कसा करावा बा” असे म्हणून पदराने डोळे पुसत सीताबाईंनी आभाळाकडे पाहत तिचे सुरकुतलेले थरथरणारे हात जोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *