- माहिती, इन्फोमराठी

चेरापुंजी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे महाराष्ट्राच्या या गावात?

देशात चेरापुंजी या गावात सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु महाराष्ट्रातल्या एका गावाने चेरापुंजीला मागे टाकलं आहे. साताऱ्यामधील लामज या गावात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज गावामध्ये तब्बल १० हजार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

केवळ देशातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक पाऊस या लामज गावात पडला असल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात अशा नावाचं गाव आहे, याची खबरही कुणाला नव्हती. परंतु पावसामुळे लामज प्रकाशझोतात आलं आहे.

जुलैपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेलाच नाही अजुनही थोडा पाऊस तिथे आहेच. यावर्षी च्या पावसाने गावातल्या लोकांचे प्रचंड हाल केले आहेत. येथील शेती आणि जनावरांचं मोठं नुकसान झालं आहे. गावातले लोक घाबरले आहेत. गाव सोडून जावं, अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. परंतु सर्वत्र पाणीच पाणी, रस्ता नाही, त्यामुळे कुठे आणि कसं जावं हा प्रश्न इथल्या लोकांसमोर आहे.

लामज हे गाव सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला कोयना जलाशयाच्या काठावर महाबळेश्वर तालुक्यात आहे. सुमारे ९० घरांच्या उंबऱ्यांचे व साधारण ४०० लोकसंख्येचे दुर्गम खेडेगाव आहे. हे गाव कांदाटी खोºयात असून, या गावात जाण्यासाठी बामणोली येथून लाँचने सुमारे दीड तास वेळ लागतो. जिल्हा परिषदेची लाँच या गावात जाते.

दुसरीकडून तापोळा येथून तराफ्यात गाडी घेऊन पलीकडून गाढवलीमार्गे कच्च्या रस्त्याने जाता येते. लामज या गावात १ जून ते १६ सप्टेंबर या १०८ दिवसांत वरुणराजा १० हजार २३९ मिलिमीटर एवढा बरसला आहे. या गावात दोन वर्षांपूर्वी बसविलेल्या पर्जन्यमापकावर तशी नोंद झाली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने कच्चा रस्ताही वाहतुकीसाठी बंद आहे.

त्यामुळे सध्या ग्रामस्थांना पाण्यातून लाँचनेच प्रवास करावा लागतो. तसेच पावसाने परिसरातील विजेचे खांब पडल्याने गाव अंधारातच आहे. तर दुसरीकडे उत्तेश्वर येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर तर जून महिन्यापासून बंद आहे.

गावातील लोकवस्ती जेमतेम काही उंबऱ्यांची आहे. त्यामुळे येथील लोकांच्या मतांना निवडणुकीच्या गणितामध्ये फारशी किंमत मिळत नाही. कितीही पाऊस पडला, कितीही नुकसान झालं तरी प्रशासन, लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. कधीही त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. भारतातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून मेघालयमधल्या चेरापूंजी गावाची ओळख आहे.

पावसामुळे या गावात पर्यटन सुरु झालं आहे. लामजच्या लोकांनीदेखील निसर्गाचा हा प्रकोप संधी म्हणून बघायला हवा. तसेच प्रशासनादेखील त्याकडे लक्ष दिलं तर कदाचित लाममध्येही पर्यटन सुरु होऊ शकतं. देशातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून लामज मिरवू शकतं.

विजयश श्रीकांत भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *