नोकरी असताना, जाताना, गेल्यावर आणि परत मिळाल्यावर! सध्या आपण सर्वच जण अतिशय अनिश्चित आणि कठीण काळ अनुभवतोय. कदाचित महायुद्धानंतर प्रथमच अशी परिस्थिती आली असावी. काही दुर्दैवी लोकांच्या नोकऱ्या आधीच गेल्या आहेत, काहींना त्यांच्या मालकांनी, कंपनीने लवकरात लवकर दुसरी नोकरी शोधायला सांगितले आहे, आणि बाकीच्यांच्या अनेकांच्या सुरु असलेल्या नोकऱ्या आज जातील का उद्या जातील अशा अनिश्चित अवस्थेत आहेत.
सुखासुखी सुरु असलेली नोकरी जाणे हा एक अतिशय वेदनादायी धक्कादायक अनुभव असतो. पुढचे अनेक जीवनशैली संबंधित, कर्जासंबंधित आणि अपरिहार्य खर्च आ वासून पुढे उभे असतात. आणि दुर्दैवाने अशातच घरातील कोणाचे रुग्णालयीकरण (हॉस्पिटॅलिझशन) झाले तर मग काही विचारायलाच नको! तर आपण दुर्दैवाने अशा परिस्थितीत सापडलोच तर त्यातल्या त्यात उत्तम काय करता येईल का ते आज पाहू.
नोकरी जाताना! जेव्हा कंपनीतील HR तुम्हास बोलवून सांगते की “Your services are no more required”, मग आपल्याला मानसिक धक्का बसणे साहजिकच आहे. तिथे तुम्हास वाईट वाटले, रडावेसे वाटले तर ते नैसर्गिक आहे. त्यात लाज वाटून घेण्यासारखे काही नाही. मात्र होता होईल तो संयम ठेवा. HR शी, तुमच्या व्यवस्थापकांशी आणि कंपनीशी शक्यतो चांगले संबंध ठेवूनच बाहेर पडा.
एकदा तुम्हास काढायचे आहे असे कंपनी ठरवते तेव्हा तुम्ही त्या कंपनीतील सर्वात मोठे खलनायक असता. अगदी काल पर्यंत हक्काने ज्या डेस्क वर तुम्ही बसत असता तो डेस्क आता परका असतो. तुमच्या प्रत्येक कृतीवर HR, मॅनेजर कंपनीचे सुरक्षा रक्षक यांची नजर असते. बहुतेक वेळा तुम्हास गुड बाय मेल सुद्धा टाकू देत नाहीत.
इतकेच काय तर तुमच्या मशीन वर लॉगिन पण करू देत नाहीत. तुमचे सामान घेऊन लवकरात लवकर तुम्हास एक्सिट प्रोसेस पूर्ण करून बाहेर घालवायच्या मागे सगळे लोक असतात. हा सर्व प्रकार अतिशय अपमानास्पद आणि वेदनादायी असतो. पण काहीही झाले तरी शांत आणि संयमी राहायचा प्रयत्न करा. आक्रस्ताळेपणा करू नका.
कंपनीची एक्सिट प्रोसेस पूर्ण होण्यासाठी सर्व सहकार्य द्या. HR शी चर्चा करून पुढील EPF काढण्याची प्रोसेस समजून घ्या. एक्सिट interview मध्ये (जर झाला तर) पुन्हा भविष्यात कंपनीत येण्यास उत्सुक आहेत का? असा प्रश्न असतो.
शक्य असल्यास इथे सकारात्मक उत्तर द्या. HR कडून शक्य असल्यास मागील तीन महिन्यांच्या पगाराच्या स्लिपची प्रिंट काढून घ्या.सर्व प्रोसेस पूर्ण करून बाहेर पडा. तुमच्या जोडीदारास आणि कुटुंबास परिस्थितीची योग्य शब्दात आणि योग्य वेळी कल्पना द्या. शांतपणे घरी जा.
नोकरी गेल्यावर! घरी गेल्यावर स्थिर झालात की प्रथम जॉब पोर्टल वरील तुमचे प्रोफाइल आणि रेसुमे update करा. तिथे “Available to join immediately ” हा ऑप्शन निवडून ठेवा. तुमच्या विश्वासातील मित्रांना आणि नेटवर्क मध्ये तुम्ही जॉब शोधात आहात ते कळवा. यात लाज वाटण्यासारखे काही नाही. तुमच्या जोडीदाराबरोबर आणि कुटुंबाबरोबर चर्चा करून तुमच्या पुढील खर्चाचा आढावा घ्या.
खर्चाची तीन विभागात विभागणी करा. 1. अपरिहार्य आणि अत्यावश्यक खर्च ( जे टाळू शकत नाही असे) : a. तुमचे घर चालवण्यासाठी लागणारे खर्च ( जसे किराणा, दूध, वीजबिल,गॅस बिल, नेहमीची लागणारी औषधे वगैरे), b. तुमची कर्जाचे हप्ते. ( घर कर्ज , पर्सनल लोन, कार लोन , क्रेडिट कार्ड लोन ), c. तुमचे मेडिक्लेम हप्ते, टर्म इन्शुरन्स हप्ते. ( कोणत्याही परिस्थितीत हे खर्च टाळू नका), d. मुलांचे शैक्षणिक खर्च ( जसे स्कुल/कॉलेज फीज,शैक्षणिक साहित्य खर्च). ( फीज शक्य असल्यास दोन हप्त्यात भरा), e. सोसायटी देखभाल खर्च, f. कॉर्पोरेशन कर.
2. टाळता येणारे खर्च: a. हॉटेलिंग, b. अनावश्यक ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंग, c. महागडी वस्त्रे खरेदी, d. यज्ञ याग, पूजा अर्चा, अनावश्यक देणग्या, gifts. e. अनावश्यक फॅमिली ट्रिप्स ( विशेष करून वीक एन्ड ट्रिप्स), f. चित्रपट गृहात चित्रपट पाहणे. g. वाढदिवस साजरीकरण, h. अतिरिक्त इंटरनेट, टीव्ही , टेलेफोन कनेक्शनस.
3. पुढे ढकलता येतील असे खर्च: a. SIPs ( नवीन नोकरी मिळून सर्व स्थिर स्थावर होईतोवर बंद करा ), b. वार्षिक सहली (रद्द करा किंवा पुढे ढकला ), c. गृह सजावट / गृह देखभाल खर्च (रद्द करा किंवा पुढे ढकला).
वरील सर्व खर्चाचा आढावा घेऊन आपले खर्च कमीत कमी कसे होतील यावर चर्चा करून कृती दिशा ठरवा आणि ती लगेच अमलात आणा. तुम्हास पुढील ६ महिने जर नोकरी मिळाली नाही तर किती पैसे लागणार आहेत त्याचा आढावा घ्या. मग आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या. गुंतवणुकीची खालील प्रकारात विभागणी करा.
1. तरल गुंतवणुक (liquid assets) यात , a. फिक्स्ड डेपोसिटस, b. liquid फंडस् तुम्ही contingency फंड तयार केला असेल तर उत्तमच. c. debt फंडस्, d. सोने, चांदी, e. कॅश, f. सेविंग्स अकाउंट्स मधील पैसे
2. जड गुंतवणूक (फिक्स्ड असेट्स), a. mutual फंडस् (equity , ELSS), b. घर ( कर्ज नसलेले), c. प्लॉट (कर्ज नसलेला).
यातील तरल गुंतवणूक किती आहे ते पहा. तुम्हास पुढील ६ महिने जर नोकरी मिळाली नाही तर लागणाऱ्या खर्चातील किती रक्कम या तरल गुंतवणूक मोडून उभी राहत आहे ते पहा. जर पुरी पडणार नसेल आणि कदाचित गरज पडली तर तुम्हास तुमच्या फिक्स्ड गुंतवणुकी मोडायला लागतील हे लक्षात घ्या.
त्यानुसार योग्य वेळी निर्णय घेऊन फिक्स्ड गुंतवणुकी मोडायचा तयारीस लागा. एखादा फ्लॅट किंवा प्लॉट विकायला कमीत कमी १ महिना ते २ – ३ वर्षे लागू शकतात. हा डिस्ट्रेस सेल असेल हे मान्य पण काहीवेळा इलाज नसतो. काही म्युच्युअल फंड्स थोडा एक्सिट लोड लावून तुम्ही केलेली गुंतवणूक परत करतात. ELSS प्रकारचे फंड्स मात्र गुंतवणूक केल्यादिवसापासून ३ वर्षे लॉक होतात. शक्य असल्यास तुमची महागडी कर्जे पहिले फेडा. अर्थात हे सर्व निर्णय तुमच्या फायनान्शिअल सल्लागाराशी चर्चा करून घ्या.
तुम्ही कोणास काही पैसे मदत म्हणून दिले असतील तर त्यांना निसंकोच होऊन संपर्क करा, परिस्थिती सांगा आणि पैसे तुमचे पैसे परत मागा. तुमच्या खर्चात जास्तीत जास्त कपात करा. मोकळा वेळ तुमचे स्किलसेट वाढवण्यात आणि कुटुंबा बरोबर घालवा. स्वतःचे SWOT अनालिसिस करा. नवीन नोकरीच्या interview च्या तयारीस लागा.
नवीन नोकरी मिळेल पण कदाचित थोड्या कमी पगारावर जावं लागेल ही मनाची तयारी ठेवा. समजा तशी परिस्थिती आली तर पगारात जास्तीत जास्त किती तडजोड आपण करू शकू याचा अंदाज घेऊन ठेवा. तुमचे मित्र, नेटवर्क, linkedin सारख्या माध्यमातुन नवीन नोकरीच्या प्रयत्नात राहा. जर फार ऑकवर्ड वाटणार नसेल तर योग्य त्या नातेवाईकांची मदत घ्या.
वेळ पडली तर कमी भाड्याच्या छोट्या घरात जायची तयारी ठेवा. जर परिस्थिती बिघडली, ६ -७ महिन्यांनंतर ही नोकरी नाही मिळाली तर तुंमचे कर्जाचा बोजा असलेले घर, कार विकून कर्जमुक्त व्हायचा विचार तुम्हास करावा लागेल. त्यासाठी तुमच्या फायनान्शिअल सल्लागाराशी चर्चा करून त्याची मदत घ्या.
तुम्हास ६ -७ महिन्यांनंतर ही नोकरी मिळत नसेल तर नक्कीच तुमच्या प्रोफाइल मध्ये काहीतरी अडचण आहे हे लक्षात घ्या. त्यासाठी तुमच्या जुन्या वरिष्ठांशी, मित्रांशी मोकळेपणाने बोला आणि स्वतःत सुधारणा करा. तुमच्या छंदास वेळ द्या. पण त्यासाठी फार पैसे खर्च होणार नाहीत याची काळजी घ्या.
नोकरी असताना / परत मिळाल्यावर ! ! तुमच्या खर्चाचे योग्य पुनर्नियोजन करा. Contingency फंड तयार करा. साधारण तुमच्या मासिक खर्चाच्या ६ पट इतका हा contingency फंड असावा. टर्म इन्शुरन्स घ्या. साधारण तुमच्या सध्याच्या उत्पन्नाच्या २० पट इतका हा इन्शुरन्स असावा. पण यासाठी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.
मेडिक्लेम इन्शुरन्स घ्या. किती ते तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या. कोणत्याही प्रकाचे इन्सुरन्सचे हप्ते काहीही करून थकवू नका. यासाठी तुमच्या जीवनशैलीत तडजोड करावी लागली तरी हरकत नाही. शक्यतो कर्जे घेऊच नका. घेतलेच असेल तर काहीही करून थकवू नका. यासाठी तुमच्या जीवनशैलीत तडजोड करावी लागली तरी हरकत नाही.
लक्षात ठेवा, खालील तीन प्रकारची कर्जे योग्य पद्धतीने घेतली आणि वापरली तर ती माणसास श्रीमंत करतात. शैक्षणिक कर्ज, व्यवसाय कर्ज, गृह कर्ज. बाकीची सर्व कर्जे माणसास गरीब करतात.
कोणताही खर्च करताना वॉन्ट आणि नीड चा नियम वापरा. (गुगल करून याबाबत माहिती मिळेल). पुढच्या किमान ५ वर्षाचा विचार करून सातत्याने तुमची कौशल्ये वाढवत राहा. त्यासाठी वार्षिक काही रक्कम खास करून आरक्षित करा. तुम्ही कंपनीवर अवलंबून राहण्यापेक्षा कंपनी कशी तुमच्यावर अवलंबून असेल यासाठी प्रयत्नशील राहा. आर्थिक सल्लागार नेमुन तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवा आणि त्यादृष्टीने गुंतवणूक सुरु करा.
तुमच्या पाल्यांना बचत आणि गुंतवणुकीचे बाळकडू लहानपणापासून द्या. नोकरी चालू असतानाच आपत्कालीन परिस्थितीशी सामना करायला सातत्याने तयार राहा. पॅसिव्ह इन्कम कसे निर्माण करता येईल याचा विचार करा आणि त्यासाठी कृती करा. पूर्वी तुम्ही अडचणीत असताना कोणाकडून मदत घेतली असेल तर ती न विसरता परत करा.
तुमच्या मित्रास किंवा नातेवाईकास काही पैशाची मदत करणार असाल तर कमीत कमी जोखीम पत्करून करा. मदत करतेवेळीच परत फेडीच्या गोष्टी न लाजता बोलून घ्या. इतकीच मदत करा की जी बुडाली तरी तुमच्या आर्थिक उद्दिष्टाना त्याची झळ पोहोचणार नाही. मदत करणे शक्य नसेल तर नम्र शब्दात नकार द्यायला संकोच करू नका.
लक्षात ठेवा: दुसर्यास मदत करण्यासाठी तुम्ही त्याच्या पेक्षा खूप सशक्त असायला हवेत. नाहीतर तुम्ही आणि तो ज्यास तुम्ही मदत करता आहेत, दोघंही अडचणीत याल. वरील मार्गदर्शक नियम थोडे conservative वाटतील, पण दुर्दैवाने अशी वाईट परिस्थिती उद्भवलीच तर हेच नियम तुम्हास तारतील! लेखन – कौस्तुभ पोंक्षे सर