lonavala korigad
- इतिहास

लोणावळ्याच्या कुशीत वसलेला कोरीगड

लोणावळा म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्गाने अच्छादन घातलेला सुंदर परिसर. याच लोणावळ्याच्या सौंदर्यात भर म्हणून कोरीगडाने आपला ठाण मांडला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पूर्वेला लोणावळ्यापासून 22 किलोमीटर अंतरावर हा किल्ला लागतो. किल्ल्याच्या पायथ्याशी आंबवणे गावापर्यंत बसची व्यवस्था आहे. या गडाची उंची 1010 मीटर इतकी असून हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात येतो. किल्ल्याची चढाई तशी सोपी आहे.

कोरीगडाला चहुबाजूंनी तटबंदीचा वेढा आहे. सद्यस्थितीत या गडावर उत्तर प्रवेशद्वार, कोराई देवीचे मंदिर, गणेश टाके, दक्षिण दरवाजा अशा अनेक वास्तू पाहायला मिळतात.

गडावरील कोराई देवी ही या गडाची देवता असल्याचे मानले जाते. चतुर्भुज असणाऱ्या या देवतेच्या हाती त्रिशूळ, डमरू, गदा ही शस्त्र पाहायला मिळतात. या मंदिरासमोर सुंदर दीपमाळ, भग्नावस्थेत असलेले वृंदावन, दोन तोफा दिसतात.

या गडास “शहागड” म्हणूनही ओळखले जाते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबवणे या गावी पूर्वी बाजारपेठ भरत होती. त्यावेळी या गावास शहापूर असे नाव होते. म्हणून या गडास शहागड हे नाव असावे. या किल्ल्यावर इ.स 1818 साली इंग्रजांनी हल्ला केला होता. त्यामुळे गडावर बरीच पडझड झालेली दिसते.

या गडावरून आपणास अनेक किल्ल्यांचे दर्शन होते. आकाश अगदी स्वच्छ असेल तर सिंहगड ही दिसतो. माणिकगड, कर्नाळा, प्रबळगड, माथेरान, तोरणा, असे अनेक किल्ले कोरीगडारून दिसतात. किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाचे अविश्वसनीय सौंदर्य पाहून अगदी आपण या सौंदर्याच्या प्रेमात पडतो.

या गडाचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे डावीकडील कोनाड्यात गणपतीची दोन फूट सिंदुरचर्चित कोरीव मूर्ती दृष्टीस पडते. म्हणून येथील दरवाज्यास गणेश दरवाजा असे म्हणतात.

दरवाजावर कमानीलगत कोरीव नक्षीकाम केलेले दिसते. गडाचा परिसर तसा अगदी सुंदर आहे. नवख्या ट्रेकर्सना हा गड म्हणजे एक सुंदर अनुभवच म्हणावा लागेल. तुम्ही या गडावर सहकुटुंब जाऊ शकत. या गडाचे रूप अगदी मनाला भावेल असे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *