विघ्नहर म्हणजे अडचणींचे निवारण करणारा. या गणेशाने विघ्नासूर राक्षसाचा वध केला म्हणून त्याला हे नाव पडले असेही सांगितले जाते. कुकडी नदीकिनारी असलेले ओझर हे छोटेसे गांव. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावपासून अवघ्या आठ किलो मीटर अंतरावर ओझर हे गाव आहे. गजाननाने येथे विघ्नासुराचा वध केला आणि नंतर इथेच वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना दगडी तट आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले भालदार – चोपदार आहेत.मंदिराच्या प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. उत्सवाच्या वेळी त्या प्रज्वलित करतात.
विघ्नहर गणेशाच्या मंदिराचा घुमट सोन्याचा मुलामा दिलेला असून असा घुमट असलेले अष्टविनायकातले हे एकमेव मंदिर आहे. देऊळ पूर्वाभिमुख आहे आणि मंदिराभोवती दगडी भिंत आहे. येथून लेण्याद्रीचा डोंगर दिसतो.
मंदिराचा सभामंडप २० फूट लांबीचा असून दोन ओवर्याभ आहेत. गणेशापुढे संगमरवरी मूषकमहाराज आहेत. मंदिराच्या भितींवर अतिशय सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत. श्रीविघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची पूर्णाकृती अशी आहे. मूर्तीच्या डोळ्यात माणके, कपाळावर हिरा आणि बेंबीत खडा बसविलेला आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धीसिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत.
मंदिराचा घुमट बाजीराव पेशवे पहिले यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव करून वसई सर केल्यानंतर बांधला असल्याचे सांगतात. मंदिराच्या भोवती असलेली दगडी भिंत इतकी रूंद आहे की त्यावरून सहज चालत जाता येते.
कसे पोहोचाल : पुणे हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. पुणे नाशिक महामार्गावरच हे ठिकाण असून एकाच दिवसाच्या ट्रीपमध्ये ओझर आणि लेण्याद्री अशा दोन्ही गणपतीस्थानांना भेट देता येते.
थोडा वेळ असेल तर एखादा मुक्काम करून शिवनेरी किल्ल्याची सफरही करता येते. पुणे येथील शिवाजीनगर येथून जुन्नर येथे जाण्यासाठी एस.टी. बस व खासगी वाहने सहज उपलब्ध होतात. नाशिक येथूनही ओझरसाठी एसटी बस आणि खासगी वाहने उपलब्ध होतात.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगल्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.