पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती.
पेशवा हा बहुधा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ ‘सर्वात पुढे असलेला’ असा आहे. दख्खनमध्ये त्या शब्दाचा मुस्लिम शासकांकडून प्रयोग केला गेला. मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराजांनी, त्याच्या इ.स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले.
असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजी महाराजांनी या पदाचे सन १६७४ मध्ये पंतप्रधान असे नामकरण केले. परंतु ते नाव त्या काळात त्यामानाने अधिक वापरले गेले नाही. मात्र आज कोणत्याही देशाच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला मराठीत पंतप्रधानच म्हणतात.
खरे तर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून. पण श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजवला की लोकांनी त्यांना सहजच श्रीमंत हा किताब दिला. हा किताब पेशव्यांनी १०४ वर्षे टिकवून ठेवला. पेशवे दिल्लीच्या बादशहाचे नोकर नव्हते आणि छत्रपतींचे मांडलिकही नव्हते. ते होते छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते.
पण अतिशय पराक्रमी असून बहुतेक सर्व पेशवे हे अल्पायुषी होते. त्यामुळे राज्यात विद्या, कला यांची वाढ करण्यासाठी त्यांना स्वस्थता मिळाली नाही पेशव्यांची कारकीर्द म्हणजे सततची युद्धमोहीम असे चित्र उभे राहिले. सरदार मुजोर झाले आणि उत्तर आणि दक्षिण दोहीकडे मित्र जोडण्याऐवजी शत्रू वाढत गेले.
नाना फडणविसांच्यानंतर इंग्रजांच्या उद्योगांकडे पेशव्यांचे दुर्लक्ष झाले, आणि ब्राह्मण पेशव्यांनी मराठी राज्य घालविले ही अपकीर्ती पदरी आली. त्यामुळे १०४ वर्षांची पेशवाईची कारकीर्द झाकोळली गेली.
पेशव्यांची कारकीर्द
श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशवे. श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता.
बाळाजी विश्वनाथ पेशवे (इ.स.१७१४-१७२०)
पहिले बाजीराव पेशवे (इ.स.१७२०-१७४०)
बाळाजी बाजीराव पेशवे ऊर्फ नानासाहेब पेशवे (इ.स.१७४०-१७६१)
माधवराव बल्लाळ पेशवे ऊर्फ थोरले माधवराव पेशवे (इ.स.१७६१-१७७२)
नारायणराव पेशवे (इ.स.१७७२-१७७४)
रघुनाथराव पेशवे (अल्पकाळ)
सवाई माधवराव पेशवे (इ.स.१७७४-१७९५)
दुसरे बाजीराव पेशवे (इ.स.१७९६-१८१८)
दुसरे नानासाहेब पेशवे (गादीवर बसू शकले नाहीत.
लेखन – संतोष काशिद, www.infomarathi.in