नुकतीच १३ मार्च रोजी “समांतर” ही मराठी वेबसिरीज एम एक्स प्लेयर या माध्यमावर लाॅंच झाली. सतीश राजवाडे या मराठी सिनेमांच दिग्दर्शन करणाऱ्या अनुभवी दिग्दर्शकाने या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. अर्थातच सतीश राजवाडेंचा अनुभव वा त्यांच कौशल्य नव्याने सर्वांना सांगायची तेवढी गरज भासत नाही.
एका लग्नाची दुसरी गोष्ट, जीवलगा अशा मालिकाच उदाहरण म्हणून घेऊ शकता. सोबतच त्यांची स्वप्नील जोशी सोबतची केमिस्ट्री अत्यंत चांगली व रूळलेली आहे असं म्हणायला गेलं तर हरकत नाही. नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या वेबसिरीजची मुळ रचना ही सुहास शिरवळकर लिखीत संमातर या पुस्तकावर आधारित आहे.
यापूर्वी सुहास शिरवळकर लिखीत दुनियादारी पुस्तकावरचं मराठीत दुनियादारी हा सिनेमा येऊन गेला, ज्याने प्रेक्षकांची मनं जिंकलीच. सुहास शिरवळकर एक उत्कृष्ट हिरेजडीत साहित्य लेखक म्हटले तरी चालतील. त्यांच साहित्य आजही तरोताजा आणि खिळवून ठेवणारं वाटतं. तरी आता मुद्दावर येऊन सांगायच म्हणजे, या सिरीजमधे स्वप्नील जोशी बऱ्याच दिवसांनी झळकला आहे आणि तोही चक्क एका वेगळ्या ढंगात. अर्थात हे पात्र साकारणं कदाचित जरासा वेगळा अनुभव स्वप्नीलला नक्कीच देऊन गेलं असणार यात वाद नाही.
या सिरीजमधे असलेली तेजस्विनी पंडीत हिनेदेखील छान भूमिका वठवली आहे. तिच्या भूमिकेला फारसा वाव नसला तरीदेखील तिने असलेलं काम अगदी उत्तमरित्या साकारत ते पात्र धरून ठेवलं आहे. इतर कलाकारांनीही त्यांच्या भुमिकेला व्यक्तीगत न्याय दिला आहे.
समांतर ही वेबसिरीज एक प्रकारचा शहारा अंगावर उमटवून जाते. संपूर्ण कथानक पहात असताना आपल्याला सतत वाटतं राहतं जणू कथानकात काहीतरी चुकतंय किंवा कशाची तरी उणीव आहे; अर्थात यात खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक नक्कीच यशस्वी झालेत म्हणावं लागेल. या कथानकाचा साचा भूत, भविष्य आणि वर्तमान या काळाच्या तीन चक्रांवर अवलंबून चाललेला आहे. समांतर थोडक्यात चालू राहतं ते एक आयुष्य.
एक व्यक्ती जो आयुष्यात पैसा कमावतो पण त्याला तो पैसा जमवून ठेवण जमत नाही, अर्थात त्यात त्याची नियती आड येत राहते. वैतागलेला, सतत रागराग होणारा आणि अतिउत्साही असलेला असा एक 33 वर्षीय तरूण स्वप्नील जोशीने साकारला आहे.
त्या व्यक्तीच्या आयुष्यात भविष्यात असं काहीतरी खास घडणार आहे का? असेल तर ते काय असणार? आणि मुळात एका साध्या माणसाचं भविष्य सांगायला एक भविष्यकार नकार का देतो? या सर्वांमधे अडकून पडलेला गुंतागुंतीचा एक प्रश्न म्हणजे, सुदर्शन चक्रपाणी हा व्यक्ती कोण? आणि या कथेतला नायक अगदी रोचकतेने अंधारलेल्या वाटांवरूही जाऊन का त्याला शोधतोय? धडपड कोणाच्या? एकतर भविष्य भूतकाळाला शोधतयं की मग भूतकाळाला भविष्याला जगायचंय?
ही कथा ज्या पद्धतीने रंगवलेली आहे नक्कीच एक थ्रील आणि खूप सारे प्रश्न मनात उमटवून जाणारी आहे. काही ठिकाणी संवादाची उत्तम सांगड घातलेली पहायला मिळते तर काही ठिकाणी विनासंवाद जो स्क्रीनप्ले चालतो तो आपल्याला धरून ठेवतो. एक अनोखा आणि वेगळा अनुभव आयुष्यातल्या प्रत्येक लेख्याजोख्याबद्दल घ्यायचा असेल तर नक्कीच वेबसिरीज आवर्जून पहायला हवी.
काही प्रसंगांमधून ढील सुटल्याची प्रचिती येते परंतु पुन्हा ती ग्रीप या सिरीजने पकडून ठेवण्यात यश मिळवलं आहे. बऱ्याच दिवसांनंतर काहीतरी उत्तम कंटेंट असलेली गोष्ट पाहण्यास आलेली असल्याने मनाला नक्कीच आनंद मिळतो. त्यामुळे भरपूर साऱ्या प्रश्नांची उलगडे न करता थेट ही सिरीज पाहून, तुम्हीच याचा सारांश ठरवा.
कथेसाठी गुणांकन:- 5/4, अभिनयासाठी गुणांकन:- 5/3.5, दिग्दर्शन आणि मांडणी:- 5/3, एकुण गुणांकन:- 5/3.5